पाणी काटकसरीने वापरा; कोयना धरणाच्या दुरुस्तीमुळे सिंचन योजनांचे ५० टक्के पंप बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:31 IST2026-03-13T15:31:02+5:302026-03-13T15:31:51+5:30
पाटबंधारे विभागाची माहिती : किती दिवस होणार पाण्याचा अपुरा पुरवठा.. वाचा

संग्रहित छाया
सांगली : कोयना धरणाच्या स्टिलिंग बेसिनच्या दुरुस्तीमुळे सध्या कोयना धरणातून नदीपात्रात मर्यादित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांचे ५० टक्के पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी नदीवरील ग्राहकांनी पुढील आठ दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाने केले आहे.
जिल्ह्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ या महत्त्वाच्या उपसा सिंचन योजनांसाठी कृष्णा नदीतून पाणी उचलले जाते. या योजनांच्या रब्बी व उन्हाळी आवर्तनासाठी कोयना धरणातून, तर म्हैसाळ योजनेसाठी कोयना आणि वारणा धरणातून पाण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सध्या कोयना धरणाचा जिवंत पाणीसाठा ६४.७४ टीएमसी असून वारणा धरणात १७.७७ टीएमसी साठा उपलब्ध आहे. सध्या कोयना धरणातून केडीपीएच टप्पा १ व २ मधून २१०० क्यूसेक्स इतका विसर्ग सोडला जात आहे, तर वारणा धरणातून १७७० क्यूसेक्स इतका विसर्ग सोडला जात आहे, त्यापैकी दानोळी बंधाऱ्यावर प्रत्यक्ष सुमारे ८०० क्यूसेक्स पाणी उपलब्ध होत आहे.
वाढत्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढत असताना कोयना धरणाच्या नदी विमोचकातून अतिरिक्त १००० ते १५०० क्यूसेक्स विसर्ग सध्या सोडता येत नाही. कोयना धरणाच्या स्टीलिंग बेसिनच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून ते १८ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या तिन्ही योजनांचे पंप मर्यादित संख्येने सुरू ठेवण्यात आले आहेत. सध्या टेंभू योजनेचे १६ पंप म्हणजे सुमारे ५३ टक्के, ताकारी योजनेचे ८ ते १० पंप म्हणजे सुमारे ६३ टक्के, तर म्हैसाळ योजनेचे १३ ते १४ पंप म्हणजे सुमारे ५० टक्के पंप सुरू आहेत.
१८ मार्चनंतर पूर्ण क्षमतेने सिंचन योजना चालू : चंद्रशेखर पाटोळे
१८ मार्चनंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर १९ मार्चपासून नदी विमोचकातून १००० ते १५०० क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर एक-दोन दिवसांत टेंभू, ताकारी व म्हैसाळ या योजना पूर्ण क्षमतेने सुरू करून उर्वरित उन्हाळी हंगामात पंप पूर्ण क्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकरी, उद्योग तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना लाभार्थ्यांनी पुढील आठ दिवस पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी केले आहे.
कोयना, वारणा धरणातील पाणीसाठा, विसर्ग स्थिती
- कोयना धरण साठा : ६४.७४ टीएमसी
- वारणा धरण साठा : १७.७७ टीएमसी
- कोयना विसर्ग : २१०० क्युसेक्स
- वारणा विसर्ग : १७७० क्युसेक्स