सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेतील अपहाराचे ४० लाख रुपये वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:41 AM2024-05-22T11:41:16+5:302024-05-22T11:41:44+5:30

दुष्काळ मदत निधीवरील डल्ला : शंभर टक्के रक्कम वसुलीसाठी बँक प्रशासनाकडून प्रयत्न

40 lakh rupees recovered for embezzlement in Tasgaon branch of Sangli District Bank | सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेतील अपहाराचे ४० लाख रुपये वसूल

सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेतील अपहाराचे ४० लाख रुपये वसूल

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेमधील शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ५६.३३ लाख रकमेवर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच डल्ला मारला होता. निलंबित कर्मचारी योगेश वजरीनकर यांनी ४० लाख रुपये बँकेत जमा केले आहेत. अपहारातील १०० टक्के रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत.

जिल्हा बँकेच्या तासगावमधील मार्केट यार्ड शाखेतील दुष्काळी निधीवर तेथील कर्मचारी योगेश वजरीनकरने अपहार केला. त्यांचा सहकारी निमणी (ता. तासगाव) शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदतीत २१ लाख रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी जबाबदार धरून प्रमोद कुंभार, तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम. व्ही. हिले आणि लिपिक योगेश वजरीनकर यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई झाली.

या कारवाईनंतर जिल्हा बँक प्रशासनाने केवळ दोनच दिवसात ४० लाख रुपये वसूल केल्याची माहिती देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व शाखांची तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहा पथके, ४८ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

जिल्हाभरात सहा पथके स्थापन केली आहेत. पथकामध्ये ४८ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांना मंगळवारी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. संबंधित पथकाकडून येत्या पाच ते सहा दिवसांत तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

दुष्काळी निधीतील अपहार प्रकरणी तिघांवर निलंबनाची कारवाई केली. सखोल चौकशी करून अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर फौजदारीही दाखल होईल. रक्कम वसूल झाली तरी त्यांच्यावरील कारवाई प्रक्रिया सुरूच ठेवली जाईल. - शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

Web Title: 40 lakh rupees recovered for embezzlement in Tasgaon branch of Sangli District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.