राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालयात नोकरीचे आमिष; २० लाखाला गंडा, सांगलीत एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:09 IST2026-03-04T13:07:12+5:302026-03-04T13:09:52+5:30

शहर पोलिसांत तक्रार : कराड, शिराळा तालुक्यातील तिघांची फसवणूक

20 lakhs fraud on the pretext of jobs in the President's and Prime Minister's offices Crime registered against one in Sangli | राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालयात नोकरीचे आमिष; २० लाखाला गंडा, सांगलीत एकावर गुन्हा दाखल

संग्रहित छाया

सांगली : दिल्लीतील राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालयात कायमस्वरूपी लिपिक पदावर दोघांना नोकरी लावण्याच्या आमिषाने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित अजय बाबूलाल शहा (रा. महावीरनगर, वखारभाग, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०२३ ते दि. १० जानेवारी २०२४ या कालावधीत घडली. याप्रकरणी प्रकाश दिनकर संदे (वय ५८ रा. वर्धमान सोसायटी, धनकवडी, पुणे. मूळ रा. वडगाव जि. सातारा) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, फिर्यादी प्रकाश संदे हे एका पुण्यातील संस्थेत नोकरीस होते. सध्या ते निवृत्त असून कुटुंबियांसह कराड तालुक्यातील वडगावमध्ये राहतात. संदे यांची ओळख सांगलीतील संशयित अजय शहा यांच्याशी २०२३ मध्ये झाली होती. शहा यांनी माझी दिल्ली येथील पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालयात ओळख आहे. त्या ठिकाणी सारखे येणे-जाणे असते, माजी राष्ट्रपतींशी माझे बोलणे होत असते, असे सांगितले. 

त्यानंतर शहा आणि संदे दोघेजण दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन आले होते. संदे यांचा विश्वास संपादन करून कायमस्वरूपी लिपिकाची नोकरी देतो, असे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन संदे यांनी त्याच्या परिचयाचे पंडित आकाराम गायकवाड (रा. शिराळा) आणि बाबासोा ज्ञानू नायकवडी (रा. चरण, कोकरूड) यांच्या मुलांना नोकरी लावायची आहे, असे सांगितले.

त्यासाठी संदे यांनी २० लाखांचा चेक दिला. १० जानेवारी २०२४ रोजी अजय शहा यांनी बँक ऑफ बडोदा सांगली येथे चेक वटवून पैसे घेतले. पैसे घेऊनही नोकरीबाबत काहीच हालचाल झाली नसल्याने फसवणूक झाल्याचे संदे यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अजय शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 20 lakhs fraud on the pretext of jobs in the President's and Prime Minister's offices Crime registered against one in Sangli