Sangli: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष, वाळवा तालुक्यातील १४ जणांना तीन कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:11 IST2025-07-12T15:11:12+5:302025-07-12T15:11:41+5:30
बडे मासे निसटले.. छोटे तडफडत आहेत

Sangli: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष, वाळवा तालुक्यातील १४ जणांना तीन कोटींचा गंडा
इस्लामपूर : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा ४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत वाळवा तालुक्यातील बनेवाडी आणि नेर्ले येथील पाच जणांनी संगनमत करत १४ गुंतवणूकदारांना ३ कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आली. एप्रिल १९ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार इस्लामपूर शहरात घडला आहे.
याबाबत पिलाबाई सीताराम पाटील (७५, रा. नेर्ले) यांनी गुरुवारी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून शेअर दलाल जितेंद्र महादेव यादव (४२), दीपाली जितेंद्र यादव आणि योगेंद्र महादेव यादव (तिघे रा. बनेवाडी), तसेच प्रकाश साहेबराव पाटील (५४), नंदा प्रकाश पाटील (५०, दोघे रा. नेर्ले) अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदार कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यातील मुख्य संशयित जितेंद्र यादव व त्याच्या पत्नीने शेअर बाजारातील ज्ञान मिळवल्यावर दोघांनी मुंबई-पुण्यातील नोकऱ्या सोडून इस्लामपुरात या व्यवसायाची सुरुवात केली होती. आष्टा नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी वैष्णवी एंटरप्रायझेस या नावाने कार्यालय थाटून हा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा गोरख धंदा सुरू केला होता.
सुरुवातीच्या काळात त्याने अनेक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे इतरही अनेक छोटे-मोठे गुंतवणूकदार त्याच्याकडे येत राहिले. त्यातूनच वरील पाच जणांनी संगनमत करत १४ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यादव आणि इतर साथीदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्यांना दरमहा ४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली.
फिर्यादी पिलाबाई पाटील यांच्यासह इतर १४ व्यक्तींनी त्याच्याकडे २ कोटी ९६ लाख ६५ हजार २११ रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांना या गुंतवणुकीवर परतावा तर मिळाला नाहीच वर मुद्दल रक्कम देखील मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली. या गुन्ह्याचा अधिक तपास जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
बडे मासे निसटले.. छोटे तडफडत आहेत..!
जितेंद्र यादव याने वाळवा तालुक्यासह बाहेरील गावातील अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसह लक्ष्मीपुत्रांना गंडवले आहे. त्यांच्याकडील गुंतवणुकीची व्याप्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे. यादव हा गुंतवणुकीवर चांगला परतावा देत असल्याने त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. त्यातून अनेक बडे मासे त्याच्या गळाला लागले. त्याचा व्यवसाय बघता-बघता शेकडो कोटींच्या घरात गेला. आतापर्यंत जितेंद्र यादववर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, बड्या गुंतवणूकदारांनी आपल्या बाहुबलाच्या जोरावर सुटका करून घेतली आहे. पण, यातील छोटे गुंतवणूकदार लटकले आहेत.