Ratnagiri: रायपाटणमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खूनच, तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:57 IST2025-10-17T12:56:40+5:302025-10-17T12:57:53+5:30
गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याने चोरीच्या कारणातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज

Ratnagiri: रायपाटणमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खूनच, तपास सुरु
राजापूर : रायपाटणमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या ७४ वर्षीय वैशाली शांताराम शेटे यांचा खूनच झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या डोक्यावर जखम होती आणि शरीर काळे पडले होते, यावरून त्यांचा खून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याने चोरीच्या कारणातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजापूर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, विच्छेदनानंतर वैशाली शेटे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रायपाटण टक्केवाडीतील वैशाली शेटे यांचा मृतदेह बुधवारी त्यांच्या घरी आढळला. वैशाली शेटे यांच्या डोक्यावर जखम आढळली आहे. त्यांचे शरीर काळे पडले होते. मृतदेहाच्या या प्राथमिक तपासणीनंतर त्यांचा खूनच झाला असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.
त्यामुळे अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव हे गुरुवारीही रायपाटण येथेच तपासकामी उपस्थित होते. न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक लॅब) पथकही गुरुवारी रायपाटणमध्ये दाखल झाले होती.
चोरीसाठी खुनाचा अंदाज
वैशाली शेटे यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा कानातच होत्या. मात्र, त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन मात्र गायब होती. त्यामुळे चोरीच्या कारणातूनच हा खून झाल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.