कोकणातील प्रक्रिया उद्योगांना चालना देणार : प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:29 IST2025-10-07T15:28:41+5:302025-10-07T15:29:21+5:30
आर्थिक विकासासाठी जिल्हा बँकांची ताकद वापरणार

कोकणातील प्रक्रिया उद्योगांना चालना देणार : प्रवीण दरेकर
रत्नागिरी : कोकणातील फलोत्पादन, मासेमारी यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आणि पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून सहकाराचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कोकणात प्रक्रिया उद्योगांना चालना देणार असल्याची माहिती राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी साेमवारी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, कोकणात सहकार वाढला पाहिजेत. तसेच कोकणातील अडचणीत असलेल्या सहकारी संस्थांना ऊर्जितावस्था मिळाली पाहिजे, वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून येथील आर्थिक विकासाला बळकटी मिळाली पाहिजे. या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या राज्य सहकारी बोर्डाची विभागीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
आज कोकणामध्ये फलोत्पादन प्रक्रिया उद्योग सहकारी संस्थामधून होऊ शकतो. मासेमारी प्रक्रिया करणारा उद्योग उभारू शकतो. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून सहकाराचं जाळं उभे करता येईल. प्रामुख्याने या तीन सेक्टरवर असणाऱ्या संस्थांना बळकटी देणे, नवीन प्रकल्पासाठी सहकारी संस्था उभ्या करून त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मध्यवर्ती बँकांना तयार करणे, यासाठी आपण काम करणार आहोत. कोकणात काजू, नारळ, मासे उत्पादन होत आहे. तसेच पर्यटनाला मोठा वाव आहे, या सर्व गोष्टींसाठी राज्य सहकारच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
काेकणाच्या आर्थिक विकासासाठी जिल्हा बँकांची ताकद वापरणार
कोकणातील सर्वच जिल्हा बँका अ वर्गात आहेत. या सर्व बँकांना एकत्रित करून त्या बँकांकडून एक हजार कोटी रुपये कोकणातील प्रकल्प व विकासासाठी देऊ शकतो. ही भूमिका जिल्हा बँकेत मांडली आहे. या पाचही जिल्हा बँकांची लवकरच एक बैठक लावणार आहे. या बँकांची आर्थिक ताकद कोकणाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने लावता येईल, याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.