कोकण रेल्वे मार्गावर मंगला एक्स्प्रेसची ट्रॉलीला धडक, रुळावर खडी टाकण्याचे काम सुरू असताना घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:32 IST2026-01-12T13:31:46+5:302026-01-12T13:32:08+5:30
सुदैवाने या अपघातात काेणतीही जीवितहानी झालेली नाही. पावणे दोन तासानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत

संग्रहित छाया
खेड : काेकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून गाेव्याच्या दिशेने धावणाऱ्या मंगला एक्स्प्रेसने रुळावर खडी टाकणाऱ्या ट्रेलरला धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी ९:४० वाजता घडली. हा अपघात दिवाणखवटी ते कशेडी बाेगद्यादरम्यान झाला. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक पावणे दाेन तास ठप्प झाली हाेती. सुदैवाने यामध्ये माेठी दुर्घटना घडली नाही.
काेकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे ते दिवाणखवटी या स्थानकादरम्यान दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. या कामादरम्यान रुळावर खडी टाकण्याचे काम सुरू हाेते. हे काम सुरू असतानाच विन्हेरे स्थानक पास करून मंगला एक्स्प्रेस येत असल्याचे कामगारांनी पाहिले. या कामगारांनी घाईगडबडीत सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. मात्र, एक्स्प्रेसची धडक खडी टाकणाऱ्या ट्रॉलीला बसली. सुदैवाने या अपघातात काेणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या मार्गावरील सर्व वाहतूक सकाळी ११ वाजेपर्यंत ठप्प झाली हाेती.
या दुर्घटनेनंतर ट्रॅकवर फसलेला खडीचा ट्रेलर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. अखेर सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला अपघातग्रस्त ट्रेलर ट्रॅकवरून हटवण्यात यश आले. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.