मच्छीमारांच्या विकासासाठी दर्जेदार कामे करू, मंत्री नितेश राणे यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:40 IST2025-07-28T15:39:52+5:302025-07-28T15:40:49+5:30
मिरकरवाडा बंदर विकास कामाचे भूमिपूजन

मच्छीमारांच्या विकासासाठी दर्जेदार कामे करू, मंत्री नितेश राणे यांची ग्वाही
रत्नागिरी : मच्छीमारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि काेकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आम्ही अतिक्रमणासारख्या कठाेर निर्णयांचीही भीती बाळगली नाही. आता या बंदराच्या आणि पर्यायाने येथील मच्छीमारांच्या विकासासाठी चांगल्या दर्जाची कामे केली जातील, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, मत्स्यव्यवसाय मंत्रिपदाची शपध घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी कोकण किनारपट्टीच्या सशक्तीकरणाच्यादृष्टीने तसेच किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टीकोनातून पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये या मिरकरवाडा बंदराचा विकास हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता, असे ते म्हणाले.
मात्र, याठिकाणी अतिक्रमणाच्या अडचणी समाेर आल्या. काहींनी आमच्याबद्दल तीव्र गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही ठाम राहिलाे आणि त्यामुळेच आजचा दिवस उजाडला आहे.
आम्हाला येथे प्रत्येक बाबींचा विकास करावयाचा असून, येथे मासेमारी व्यवसायासाठी प्रशस्त इमारती उभ्या राहणार आहेत. खऱ्या अर्थाने मिरकरवाडा बंदराचा विकास साधणार आहे. येथे सक्षमीकरणासाठीही निधी खर्च करण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून तुमचे भविष्य घडविण्याचे काम करणार आहोत, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, महेश म्हाप, मत्स्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
एक वर्षात काम पूर्ण करा
मिरकरवाडा बंदराचे विकासाचे हाती घेतलेले काम एका वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांना दिली. हे काम दर्जेदार झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.