रत्नागिरी शहरात एप्रिलपासून पाणीकपात, शीळ धरणात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा, मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:40 IST2025-03-24T16:40:30+5:302025-03-24T16:40:52+5:30
रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा आहे. मात्र, वाढता उष्मा व दि. १५ जूनपर्यंत शहरवासीयांवर ...

रत्नागिरी शहरात एप्रिलपासून पाणीकपात, शीळ धरणात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा, मात्र..
रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा आहे. मात्र, वाढता उष्मा व दि. १५ जूनपर्यंत शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट येऊ नये यासाठी दि. २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल दुरुस्तीसाठी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. मात्र, रमजान ईद व गुढीपाडवा यामुळे एप्रिलपासून पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरात एकूण ११ हजार जोडण्या आहेत. धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणारा आहे. परंतु, उन्हाच्या कडाक्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन हाेऊन पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेच्या पाणी विभागाने पाणीपुरवठा व्यवस्था प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीसाठी बाष्पीभवनाचा धोका ओळखून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे.
दि. २४ मार्चपासून दर सोमवारी आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला हाेता. परंतु, गुढीपाडवा व ईदमुळे नगर परिषदेने पाणी नियोजन पुढे ढकलले आहे. एप्रिल महिन्यात प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.
शीळ धरण
- पाणी साठवण क्षमता ३.६६६ दशलक्ष घनमीटर
- सध्या पाणीसाठा २.०५१ दशलक्ष घनमीटर