खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:37 IST2025-11-21T10:36:48+5:302025-11-21T10:37:47+5:30
गुरुवारी वैभव खेडेकर आपल्या कार्यकर्त्यांसह युतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिंदेसेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली

खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
खेड - नुकतेच मनसेतून भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतलेल्या वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा आल्याचं चित्र समोर आले आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. महाराष्ट्रात महायुती म्हणून पहिलाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज खेड नगरपरिषदेत दाखल झाला होता. हा अर्ज दाखल करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती, मात्र वैभव खेडेकर यांच्या गैरहजेरीने शहरात चर्चांना उधाण आले होते.
वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून आणि अपक्ष म्हणून २ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील छाननीवेळी भाजपाकडून दाखल अर्ज अवैध ठरला तर अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला. वैभव खेडेकरांनी शिंदेसेनेविरोधात नगराध्यक्षपदी उमेदवार दिल्याने जिल्ह्यात राजकारण तापले होते. त्यात आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात येऊन युतीबाबत घोषणा केली. त्यामुळे वैभव खेडेकरांची गोची झाली. खेडेकरांना पत्नी वैभवी खेडेकर यांचा अर्ज मागे घेण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठांनी दिली.
त्यानंतर गुरुवारी वैभव खेडेकर आपल्या कार्यकर्त्यांसह युतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिंदेसेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली. या भेटीनंतर खेडमध्ये युती म्हणूनच निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे संकेत दिसत आहेत. खेडेकर यांनी शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे खेडमध्ये शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशी लढत होणार असल्याचं निश्चित झाले आहे.
दरम्यान, वैभव खेडेकरांनी शिंदेसेनेच्या नेत्यांची भेट घेतल्याने खेडमधील युतीचे कोडे सुटल्याचं सांगितले जात आहे. परंतु अर्ज मागे घ्यायला अजून काही तास आहेत. त्यामुळे या कालावधीत खेडच्या राजकारणात आणखी काही नाट्यमय हालचाली दिसून येतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वैभव खेडेकर हे आधी मनसेत होते, त्यावेळी खेडमध्ये मनसेचा नगराध्यक्ष म्हणून ते सातत्याने निवडून आले आहेत. आता खेडेकर भाजपात गेल्याने नगराध्यक्षपदी त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांना संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु महायुतीमुळे वैभव खेडेकरांवर पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आली आहे.