US-Israel-Iran war: कानठळ्या बसणारे आवाज...भूकंपाप्रमाणे हादरे; रत्नागिरीतील दुबईस्थित तरुणांनी कथन केला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:37 IST2026-03-03T12:36:50+5:302026-03-03T12:37:13+5:30
दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द; बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट, प्रशासनाच्या सूचनेचे पालन

US-Israel-Iran war: कानठळ्या बसणारे आवाज...भूकंपाप्रमाणे हादरे; रत्नागिरीतील दुबईस्थित तरुणांनी कथन केला अनुभव
मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : क्षेपणास्त्राच्या माऱ्यामुळे कानठळ्या बसवणारे आवाज, भूकंपाप्रमाणे इमारतीला जोरदार हादरे यामुळे भीतीजन्य वातावरण आहे. दुबई प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेबाबत काटेकोर आहे. प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ केल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट आहे. ‘कर्फ्यू’ लागल्याप्रमाणे चित्र आहे. आम्ही सुरक्षित आहोत; परंतु भीती तर आहेच, असे दुबईतील मीना बाजार येथे राहणाऱ्या रत्नागिरीचे सुपुत्र फईम नागलेकर आणि साहिल नाकाडे यांनी सांगितले.
नाेकरीनिमित्त गेले काही वर्षे फईम नागलेकर आणि साहिल नाकाडे हे दुबई येथे वास्तव्याला आहेत. त्यांनी सांगितले की, गेले दोन दिवस आवाजांची भीती वाटत आहे. जोराचे आवाज येतात; परंतु दिसत काहीच नाही. मात्र, फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून, टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने रविवारप्रमाणे सोमवारीही ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. प्रशासनाने घराबाहेर न पडण्याची सूचना केल्यामुळे येथील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इमारतींच्या आवारातील दुकानांमधून खरेदी केल्यामुळे बहुतांश सामान संपले आहे, असेही दाेघांनी सांगितले.
दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द
साेमवारपासून शाळा महाविद्यालयांचे अध्यापन ऑनलाइन होणार आहे. येथील सीबीएसई माध्यमाच्या बोर्डाच्या सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बहुतांश कार्यालयांनी ऑनलाइन कामकाजाची सूचना केली असल्याची माहिती फईम नागलेकर आणि साहिल नाकाडे यांनी दिली.
शाळा, कार्यालय ऑनलाइन
युद्धस्थिती असली तरी प्रशासनाकडून नागरिकांना सातत्याने दिलासा दिला जात आहे आणि अफवा पसरवणाऱ्यांना मजबूत आर्थिक दंड आणि एक वर्षाची कारावासाची शिक्षा केली जाईल, असे सांगून अफवा न पसरवण्याचे आवाहन केले जात आहे. सोमवारपासून शाळा आणि कार्यालय ऑनलाइनच सुरू राहणार आहेत. तशी सूचना सर्वांना देण्यात आली आहे. मात्र, येथील परिस्थिती शांत आहे, अशी माहिती अबुधाबी येथे योग शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या रत्नागिरीतील तृप्ती महेश मोरे यांनी दिली.
युद्ध स्थिती, पण सुरक्षित
शनिवारचा दिवस खूपच तणावपूर्ण होता, सकाळपासून दर तासांनी मिसाइल दिसत होती. अर्थात सगळी नष्ट केली गेली. आज रविवारी सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होम आहे! सकाळी आठनंतर थोडी शांतता आहे. शहरातील जवळजवळ चाळीस डिपार्टमेंटल स्टोअर्स २४ तास सुरू ठेवण्यात आली आहेत. युद्ध स्थिती असली तरी आम्ही सर्व सुखरूप आहोत, असा अनुभव कतार येथे असलेल्या रत्नागिरीकर मनोज पानवळकर यांनी आपल्या मित्रांसोबत शेअर केला आहे.