रत्नागिरीतील दोन सोने व्यापाऱ्यांना कोल्हापुरातील व्यापाऱ्याने तीन कोटीला फसविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:21 IST2025-11-07T15:19:32+5:302025-11-07T15:21:49+5:30
याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत

रत्नागिरीतील दोन सोने व्यापाऱ्यांना कोल्हापुरातील व्यापाऱ्याने तीन कोटीला फसविले
रत्नागिरी : येथील दोन सोने व्यापाऱ्यांची कोल्हापूर येथील सोने व्यापाऱ्याकडून तब्बल ३ कोटी २ लाख ६६ हजार ९३० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांच्या व्यवस्थापकाने कोल्हापूर येथील विनायक बंडूजी पोतदार व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.
रत्नागिरीतील तक्रारदार राजेंद्र वसंत चव्हाण (रा. खेडेकर संकुल झाडगाव, रत्नागिरी) हे रत्नागिरीतील अर्हम् गोल्ड आणि ए. जी. गोल्ड फर्म या दोन ठिकाणी मॅनेजर म्हणून काम पाहतात. फर्मचा मुंबई व रत्नागिरी येथे सोन्याचा होलसेल व्यापार आहे. तक्रारदार चव्हाण यांनी कोल्हापूर येथील व्यापारी विनायक बंडूजी पोतदार यांच्या माध्यमातून सोन्याचे व्यवहार केले.
रत्नागिरीतील श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक चंद्रकांत सागवेकर यांनी विनायक पोतदार यांच्यासोबत ओळख करून दिल्याचे तक्रारदार चव्हाण यांचे म्हणणे आहे. दि. १८ फेब्रुवारी २०२५ आणि १ मार्च २०२५ रोजी झालेल्या सोन्याच्या व्यवहारासाठी तक्रारदार चव्हाण यांनी २२ कॅरेट सोन्याचे सुमारे १ किलो ९८७ ग्रॅम इतके सोन्याचे दागिने पोतदार यांना विकले होते. या व्यवहाराची एकूण किंमत १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक होती. याचप्रमाणे इतर बिलांचे मिळून एकूण ३ कोटी २ लाख ६६ हजार ९३० रुपये इतका आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र, त्यातील रक्कम पोतदार यांच्याकडून अदा करण्यात आली नाही.
तक्रारदाराच्या नावाने धनादेश देण्यात आले. मात्र पेमेंट स्टॉप बाय ड्रॉवर अशा कारणावरून बँकेकडून परत आले. विनायक पोतदार यांनी दिलेले धनादेश अनुक्रमे १ कोटी ५० लाख २८ हजार ३०७ रुपये आणि १ कोटी ५२ लाख ३८ हजार ६२३ रुपये इतक्या रकमांचे होते. मात्र, हे दोन्ही धनादेश बँकेकडून थांबविण्यात आले.
यानंतर संबंधित व्यापाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणात तक्रारदार चव्हाण दिलेल्या तक्रारीवरुन विनायक बंडूजी पोटदार व त्यांचे सहकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.