जनावरांची वाहतूक करणारे कोल्हापुरातील दोघे ताब्यात, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:04 IST2025-06-07T16:04:37+5:302025-06-07T16:04:53+5:30

ना खरेदीची पावती ना वैद्यकीय तपासणी

Two people from Kolhapur arrested for transporting animals, Ratnagiri Rural Police took action | जनावरांची वाहतूक करणारे कोल्हापुरातील दोघे ताब्यात, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

जनावरांची वाहतूक करणारे कोल्हापुरातील दोघे ताब्यात, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खानू पेट्रोल पंप येथे गस्तीदरम्यान रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६ लाख रुपयांचा टेम्पो आणि ३८ हजारांचे ५ बैल, असा एकूण ६ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राहुल आनंदा सावंत (२३) आणि ॠषिकेश आनंदा सावंत (२६, दोघेही रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा, कोल्हापूर), असे अटक केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. जनावरांची वाहतूक व कत्तलसंदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे, तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमाराला रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील खानू पेट्रोल पंप येथे पाेलिसांची गस्त सुरू हाेती. या गस्तीदरम्यान पोलिसांना टेम्पो (एमएच १४, एचयू ५४०६) येताना दिसला.

पोलिसांनी हा टेम्पो थांबवून तपासणी केली असता हौद्यात पाच बैल बांधलेले दिसले. हे बैल कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (अ) (ड) (ई) (फ) (एच), तसेच महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ) (ब), ९ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ११९ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १२५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव व पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, सहायक पोलिस फौजदार सावंत व कांबळे, महिला पोलिस हवालदार सावंत देसाई व पोलिस शिपाई पाटील यांनी केली.

ना खरेदीची पावती ना वैद्यकीय तपासणी

दाेघांकडे बैल खरेदी केल्याची पावती व त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचे आढळले, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्य व पाण्याची व्यवस्था न करता वेदना व यातना होतील अशा रीतीने दोरीने बांधून ठेवलेले हाेते.

Web Title: Two people from Kolhapur arrested for transporting animals, Ratnagiri Rural Police took action