सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:43 IST2025-09-25T16:43:20+5:302025-09-25T16:43:44+5:30
येत्या दोन ते तीन दिवसांत आदेश दिले जाण्याची शक्यता

सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन दिवसांत होणार आहेत. त्यासाठी ११८ शिक्षकबदलीपात्र आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रतिक्रिया जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्यास जुलै महिना उजाडला. संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षक, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या, ५३ वर्षांवरील शिक्षक यांचा समावेश होता. त्याचबरोबर संवर्ग २ म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत पात्र असलेल्या शिक्षकांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले.
संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र ठरलेल्यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील शाळांची यादी यासाठी ग्राह्य धरण्यात आली. संवर्ग ४ मध्ये बदलीपात्र शिक्षकांचा समावेश करण्यात आला. एकाच शाळेत पाच वर्षे काम आणि अवघड क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला.
जिल्ह्यातील १ हजार १०० शिक्षक बदलीपात्रच्या यादीत होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटला आहे. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत ४६४ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे.
स्थगितीमुळे प्रक्रिया थांबली
- आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवली जात आहे. यात अवघड क्षेत्रातील शाळांमधील १३२ रिक्त पदे बदलीने भरण्यात येत आहेत; मात्र ही बदली प्रक्रिया करताना एकाच शाळेत सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना तेथे जावे लागणार, हे लक्षात आल्यानंतर काही शिक्षक न्यायालयात गेले.
- न्यायालयाकडून त्याला काही दिवस स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता स्थगिती उठविण्यात आलेली आहे. आता ही बदली प्रक्रिया राबविण्यात येत असून, उपशिक्षक ११४ आणि पदवीधर शिक्षक (गणित, विज्ञान)- ४ असे एकूण ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.
- गणित व विज्ञान विषयाचे १४ पदवीधर शिक्षक न मिळाल्याने सातव्या टप्प्यातील बदल्या करूनही अवघड क्षेत्रातील शाळांमधील पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे सातव्या टप्प्यातील बदलीची प्रक्रिया सुरू झाली असून, या बदल्या दोन ते तीन दिवसांत होणार आहेत.