मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १५ तासांनी पूर्ववत; निवळी येथे गॅसवाहू टँकर-मिनी बसचा झाला होता अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:39 IST2025-06-10T15:39:13+5:302025-06-10T15:39:36+5:30
अपघातात ३० शिक्षक जखमी झाले हाेते. टँकर चालकावर गुन्हा दाखल

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १५ तासांनी पूर्ववत; निवळी येथे गॅसवाहू टँकर-मिनी बसचा झाला होता अपघात
रत्नागिरी : गॅसवाहू टँकरने मिनी बसला दिलेल्या धडकेत मिनी बसमधील ३० शिक्षक जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी मुंबई-गाेवा महामार्गावरील निवळी (ता. रत्नागिरी) येथे घडली हाेती. अपघातानंतर गॅस गळती झाल्याने सकाळी ९ वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली हाेती. ही वाहतूक १५ तासांनी मध्यरात्री १२:५० वाजता पूर्ववत करण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथून एलपीजी गॅस घेऊन टँकर (एनएल ०१, एन ४६२८) मुंबईच्या दिशेने जात हाेता. हा टँकर निवळी घाटात आला असता त्याचदरम्यान चिपळूण येथून रत्नागिरीत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना घेऊन मिनी बस (एमएच ०२, ईआर ९६०३) येत हाेती. निवळी येथे टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि मिनी बसला समाेरून धडक बसली. या धडकेनंतर मिनी बस रस्त्याच्या बाजूला २५ ते ३० फूट खाेल खाली उलटली. अपघातात मिनी बसचालकासह ३० शिक्षकांना दुखापत झाली हाेती.
अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती झाल्याने पाेलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल हाेत या मार्गावरील सर्व वाहतूक सकाळी ९ वाजता बंद केली. ही वाहतूक उक्षी, संगमेश्वर आणि पाली मार्गे वळविण्यात आली हाेती. त्यानंतर गॅसच्या टाकीवर पाणी मारून गॅस डायल्यूट करण्यात आला. संपूर्ण गॅस निकामी झाल्याची खात्री केल्यानंतर मध्यरात्री १२:५० वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
टँकर चालकावर गुन्हा दाखल
निवळी येथील अपघात केल्याप्रकरणी टँकरचालक राजेश महावीर यादव (रा. डी संजय काॅलनी, भाटी माईस पतेहपूर बेली, दक्षिण दिल्ली) याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद निवळी काेकजेवठार येथील पाेलिस पाटील संजना पवार यांनी दिली आहे. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४) व माेटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ प्रमाणे गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
दाेन शिक्षकावर उपचार सुरू
या अपघातात ३० शिक्षक जखमी झाले हाेते. त्यातील गंभीर जखमी झालेल्या मंदा सुकदेव खाडे (वय ५३, रा. सावर्डे, चिपळूण) यांच्यावर काेल्हापूर येथे उपचार सुरू आहेत तसेच मीना विनायक शिरकर (वय ३८, चिपळूण) यांना अधिक उपचारासाठी साेमवारी पुणे येथे नेण्यात आले आहे. उर्वरित सर्व शिक्षकांवर उपचार करून घरी साेडण्यात आले.