Ratnagiri: नगराध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरला, बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह तीन पदाधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:48 IST2025-11-27T16:47:28+5:302025-11-27T16:48:46+5:30
Local Body Election: गणेश पाटील यांच्याकडून कारवाई

Ratnagiri: नगराध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरला, बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह तीन पदाधिकारी निलंबित
चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह तुळसीदास पवार, राजेंद्र भुरण यांना काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. ही कारवाई वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी केली आहे. या कारवाईमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी प्रबळ असलेले उमेदवार लियाकत शाह यांचा अर्ज अवैध ठरला. तर दुसरीकडे शिंदेसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर लियाकत शाह यांनी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
यानंतर काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली हाेती. तर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या चिपळूण तालुका प्रभारी अध्यक्षपदी खेर्डी येथील प्रकाश साळवी, तर चिपळूण प्रभारी शहराध्यक्षपदी कैसर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली.
तर बुधवारी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह तुळसीदास पवार, राजेंद्र भुरण या तिघांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. याबाबतचे पत्र तिघांना पाठविण्यात आले असून, याची प्रत काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांना पाठवण्यात आली आहे.
पक्षविराेधी कारवाईचा ठपका
चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई करीत आहात. आपले हे कृत्य पक्ष शिस्तीचा भंग करणारे असल्याने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे, असे वरिष्ठ उपाध्यक्ष पाटील यांनी तिघांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.