चिपळूणमध्ये खोल नाल्यात दुचाकीसह कोसळून तिघेजण जखमी, क्रेनने काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:04 IST2026-01-14T16:04:14+5:302026-01-14T16:04:34+5:30
दुचाकीवरील ताबा सुटल्याने खोल नाल्यात कोसळले

चिपळूणमध्ये खोल नाल्यात दुचाकीसह कोसळून तिघेजण जखमी, क्रेनने काढले बाहेर
चिपळूण : येथील महामार्गावरील राधाकृष्णनगर येथील मुत्तपन मंदिरच्या स्वागत कमानीनजीक खोल नाल्यात दुचाकीसह तिघेजण कोसळून अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री ९:१५ वाजता घडली. यामध्ये तिघेही तरुण जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
महामार्गाने शहरातील बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालयाच्या दिशेने हे तिघे तरुण ॲक्टिव्हा दुचाकीने ट्रिपल सीट चालले होते. राधाकृष्णनगर येथील मुत्तपन मंदिरच्या कमानीजवळ येतात त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. यामध्ये हे तिघेही दुचाकीसह खोल नाल्यात कोसळले. या नाल्यातून नगरपरिषदेची पोलादी पाइपलाइन गेली असून, त्यावर हे तिघेही आदळले. त्यामुळे एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाले आहे. तो तरुण जागीच बेशुद्ध अवस्थेत पडला होता, तसेच अन्य दोघांनाही दुखापत झाली आहे.
त्यांना तत्काळ मदत देण्यासाठी काही नागरिक थेट नाल्यांमध्ये उतरले, परंतु नाल्याच्या दोन्ही बाजूने उंच भिंत असल्यामुळे त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. त्याच वेळी महामार्गाने क्रेन जाताना काही नागरिकांना दिसली. ती क्रेन घटनास्थळी आणून संबंधित तरुणांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर, नजीकच्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी देण्यात आले आहे. हे तिन्ही तरुण चिपळूण शहरातील रहिवासी असून, त्यातील दोघेजण शहरातील खेंड विभागातील स्थायिक असल्याचे समजते. याविषयी पोलिस स्थानकात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.