शाळेत गेले डॉक्टर, रत्नागिरी जिल्ह्यात पावणेतीन लाख विद्यार्थ्यांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:42 IST2025-02-13T15:41:18+5:302025-02-13T15:42:02+5:30

‘आरबीएसके’ अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत तपासणी

Three and a half lakh students examined in Ratnagiri district | शाळेत गेले डॉक्टर, रत्नागिरी जिल्ह्यात पावणेतीन लाख विद्यार्थ्यांची तपासणी

संग्रहित छाया

रत्नागिरी : जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अंगणवाडी आणि शाळांमधील १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. या कार्यक्रमांतर्गत या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख ७३ हजार २६७ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यातील २६,१७१ बालकांना शालेय स्तरावर उपचार उपलब्ध करून देण्यात आले तर ७,५७२ मुलांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १ एप्रिल २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करुन उपचार करणे हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि औषध निर्माता यांचा समावेश असलेली पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते.

अंगणवाडीतील बालकांची या पथकामार्फत आर्थिक वर्षात दोन सत्रात (एप्रिल ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते मार्च) तपासणी होते आणि शालेय विद्यार्थ्यांची एकदा तपासणी केली जाते. किरकोळ उपचारांची गरज असल्यास तातडीने तिथेच उपलब्ध करून दिले जातात. आवश्यक असेल त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय येथे (संदर्भीय सेवा) पाठविले जाते.

या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २,९०१ अंगणवाड्या आणि ३,०१९ शाळांमधील ३,२२,५४७ बालकांपैकी आतापर्यंत २,७६,२६७ बालकांची तपासणी करण्यात आली. गरज असलेल्या २६,१७१ बालकांना किरकोळ उपचार देण्यात आले. तर ७,५७२ विद्यार्थ्यांना संदर्भीय सेवा मिळाली.

Web Title: Three and a half lakh students examined in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.