Ratnagiri: महायुतीनेच निवडणुकांना सामोरे जाणार; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:27 IST2025-11-12T15:26:51+5:302025-11-12T15:27:42+5:30
Local Body Election: चिपळूण नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणत्या पक्षाला दिली जाईल, यावर बुधवारी अंतिम निर्णय होईल

Ratnagiri: महायुतीनेच निवडणुकांना सामोरे जाणार; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा
चिपळूण : जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिंदेसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांनी एकत्र येत अखेर मंगळवार, दि. ११ रोजी महायुतीची औपचारिक घोषणा केली आहे. जिल्ह्यातील या निवडणुका संयुक्तरीत्या लढविण्याचा राज्यात प्रथमच आदर्श रत्नागिरी जिल्ह्याने घालून दिल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
शहरातील अतिथी हॉटेलच्या हॉलमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सूर्यकांत दळवी, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नेते प्रशांत यादव, केदार साठे, राजेश बेंडल, माजी आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, शिंदेसेनेचे शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे आणि शहराध्यक्ष मिलिंद कापडी, दशरथ दाभोळकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
चर्चेनंतर तिन्ही पक्षांनी चार नगर परिषदा आणि तीनही नगरपंचायतींच्या निवडणुका महायुतीच्या नावाने लढविण्याचा निर्णय निश्चित केला. प्रभागनिहाय चर्चा सुरू असून, चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणत्या पक्षाला दिली जाईल, यावर बुधवारी संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच तिन्ही पक्षांचे नगरसेवकपदांचे उमेदवारही बुधवारपर्यंत जाहीर केले जातील.
महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून सतत होणाऱ्या टीकेवर भाष्य करत सामंत म्हणाले की, रोज सकाळी उठून महायुतीवर टीका करणाऱ्यांना आता या निवडणुकीत ठोस उत्तर देण्याची वेळ आली आहे.
रत्नागिरीतील मेळाव्यातही महायुतीचा गजर
- मंगळवारी सायंकाळी उशिरा रत्नागिरीमध्येही महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्येही तीनही पक्षांनी महायुतीनेच निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केल्याने अखेर सर्व चर्चांवर पडदा पडला.
- या मेळाव्याला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपचे अमित केतकर, सचिन वहाळकर, राष्ट्रवादीचे बाप्पा सावंत, ॲड. बंटी वणजू उपस्थित होते.