रत्नागिरी-सातारा अंतर हाेणार कमी, हातलोट घाटाचा प्रश्न मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:02 IST2025-07-12T15:01:46+5:302025-07-12T15:02:51+5:30

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा यशस्वी पुढाकार

The issue of Hatlot Ghat connecting Ratnagiri Satara has been resolved | रत्नागिरी-सातारा अंतर हाेणार कमी, हातलोट घाटाचा प्रश्न मार्गी

रत्नागिरी-सातारा अंतर हाेणार कमी, हातलोट घाटाचा प्रश्न मार्गी

खेड : पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या हातलोट घाट रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. विधानभवनात झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सक्रिय भूमिका घेतली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. वनविभागाची जमीन संपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले. तांत्रिक सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण होणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून या घाटाचे काम रखडले होते. तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाठपुरावा केला होता. सध्या राज्यमंत्री योगेश कदम यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

गावांमध्ये विकासाची गती वाढेल

वनविभाग व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी बैठक घेतली. त्यांचा पुढाकार हाच या रस्त्याच्या प्रगतीचा निर्णायक टप्पा ठरणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाले तर अनेक गावांमध्ये विकासाची गती वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडेल, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

रत्नागिरी-सातारा जिल्ह्यातील अंतर हाेणार कमी

खेड-बिरमणी-हातलोट घाटमार्ग पूर्णत्वास गेल्यास, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांतील अंतर लक्षणीय कमी होणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील तसेच महाबळेश्वर भागातील दुर्गम आणि दुर्लक्षित गावांचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. हा घाट केवळ दोन जिल्हेच नव्हे, तर रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा सर्वांत जवळचा पर्यायी मार्ग ठरणार आहे.

Web Title: The issue of Hatlot Ghat connecting Ratnagiri Satara has been resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.