एकाचा अंत्यसंस्कार होण्याआधीच आणखी चार मृतदेह समोर, चाळके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:20 IST2025-05-20T18:19:43+5:302025-05-20T18:20:45+5:30
सचिन मोहिते देवरुख : घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या निधनाचे दु:ख झेलणाऱ्या कर्ली गावातील चाळके कुटुंबावर एका अंत्यसंस्कारापाठोपाठ आणखी चारजणांचे मृतदेह ...

एकाचा अंत्यसंस्कार होण्याआधीच आणखी चार मृतदेह समोर, चाळके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
सचिन मोहिते
देवरुख : घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या निधनाचे दु:ख झेलणाऱ्या कर्ली गावातील चाळके कुटुंबावर एका अंत्यसंस्कारापाठोपाठ आणखी चारजणांचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. नियती या कुटुंबाबाबत इतकी निष्ठूर झाली की या कुटुंबाची लेक आणि नातू त्याचबरोबर मानलेली लेक आणि तिचा मुलगा अशा चौघांना काळाने आपल्यासोबत केले. खेड येथे सोमवारी पहाटे झालेल्या अपघाताने कर्ली गावाला चांगलाच धक्का बसला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कर्ली गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्धवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन चाळके यांचे रविवारी १८ राेजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा मुलगा आणि १ मुलगी तेथे आले होते. मुंबईहून त्यांची दुसरी मुलगी मिताली मोरे, जावई विवेक मोरे आणि नातू निहार मोरे हे गावी येण्यासाठी रात्रीच मुंबईहून निघाले. त्यांच्यासोबत चाळके यांची मानलेली मुलगी मेधा परमेश पराडकर, नातू सौरभ आणि जावई परमेश हेही होते. दुर्दैवाने देवरूख गाठण्याच्या काही तास आधीच खेड येथे काळाने त्यांना गाठले आणि कार दरीत काेसळून झालेल्या अपघातात मिताली, निहार, मेधा आणि सौरभ या चौघांचा मृत्यू झाला.
मुळातच कुटुंबातील आधारवड असलेल्या मोहन चाळके यांच्या मृत्यूने चाळके कुटुंबाला धक्का बसला होता. त्यात त्यांच्यावरील अंत्यसंस्काराआधीच कुटुंबातील अन्य सदस्यांच्या अपघाताची बातमी आली. कुटुंबातील एकावरील अंत्यसंस्कारापाठोपाठ इतरांचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली. चाळके यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर सर्व खेडकडे रवाना झाले.
गावावर शोककळा
मोहन चाळके उद्धवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते होतेच, शिवाय सामाजिक कामामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा होता. त्यांच्या मृत्यूपाठोपाठ या कुटुंबावर झालेल्या या अपघाताच्या मोठ्या आघातामुळे पूर्ण गावच हेलावले आहे.
अखेरचे दर्शन झालेच नाही
मेधा पराडकर या मोहन चाळके यांची मानलेली मुलगी आहेत. चाळके यांच्या निधनाची माहिती मिळताच त्याही आपल्या पती व मुलासमवेत अंत्यदर्शनासाठी गावी येण्यासाठी निघाल्या. अंत्यदर्शन मिळण्याआधी त्यांच्यावरच काळाने दुर्दैवी झडप घातली.