Local Body Election: एका अक्षरामुळे अवैध ठरला चिपळूणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला उमेदवाराचा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:32 IST2025-11-19T19:30:50+5:302025-11-19T19:32:03+5:30
नगराध्यक्षपदासाठी एकूण १३ अर्ज दाखल

Local Body Election: एका अक्षरामुळे अवैध ठरला चिपळूणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला उमेदवाराचा अर्ज
चिपळूण : फॉर्ममध्ये लिहिलेली माहिती आणि सोबत जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म यात एका अक्षराचा फरक असल्याने उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरल्याचा प्रकार चिपळूणमध्ये घडला. हा विषय चांगलाच चर्चेचा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीक्षा कदम यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रात ‘१ ब’ असा उल्लेख केला आणि सोबत जोडलेल्या ‘एबी फॉर्म’मध्ये ‘१ अ’ असा उल्लेख होता. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला.
याखेरीज नगरसेवकपदासाठीचे अन्य १२ आणि नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेले ३ अर्ज अवैध ठरले आहेत. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी दोघांना एबी फॉर्म दिल्याने मुख्य उमेदवार लियाकत शाह यांची मोठी अडचण झाली आहे. मात्र, त्यांचा नगराध्यक्षपदाचा दुसरा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे.
गोवळकोट येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दीक्षा दशरथ कदम ‘प्रभाग क्रमांक १ ब’मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपल्या नामनिर्देशनपत्रावर योग्य उल्लेख केला होता. मात्र, पक्षाच्या एबी फॉर्मवर ‘प्रभाग १ अ’ असा उल्लेख होता. अचूक माहिती न लिहिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला.
येथे नगराध्यक्षपदासाठी एकूण १३ अर्ज दाखल झाले होते. यातील तीन अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. ८ जणांचे १० अर्ज वैध राहिले आहे. नगरसेवकपदासाठी १५४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ जणांचे अर्ज बाद ठरल्याने १४१ अर्ज वैध ठरले आहेत. नगरसेवकपदासाठी एकूण १२९ उमेदवार रिंगणात आहेत. २१ नोहेंबरपर्यंत यातील किती उमेदवार माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नगराध्यक्षपदासाठी राजेश देवळेकर, विनिता सावर्डेकर, लियाकत शहा यांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरले. या सर्वांनी दोन-दोन अर्ज भरले असून, त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरला आहे. नगरसेवकपदासाठी दीक्षा कदम, दीपक निवाते, मुनीर सहीबोले, अ. कादीर मुकादम, नितीन गोवळकर, सुवर्णा साडविलकर, महंमद पाते, युगंधरा शिंदे, अंकुश आवले, सुधीर शिंदे यांचे अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. यातील बहुतांशी उमेदवारांनी दोन-दोन अर्ज दाखल केले होते.