लांजात दहा किलो वजनाचे खवले जप्त, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 14:41 IST2020-11-07T14:38:10+5:302020-11-07T14:41:13+5:30
Crime News, Ratnagiri, Police, wildlife खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला लांजा तालुक्यातील रूण येथे अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दहा किलो खवले जप्त करण्यात आले आहेत. जितेंद्र सुरेश चव्हाण असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो लांजा तालुक्यातील साटवली गावचा रहिवासी आहे.

लांजात दहा किलो वजनाचे खवले जप्त, एकाला अटक
लांजा : खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला लांजा तालुक्यातील रूण येथे अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दहा किलो खवले जप्त करण्यात आले आहेत. जितेंद्र सुरेश चव्हाण असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो लांजा तालुक्यातील साटवली गावचा रहिवासी आहे.
रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. एक व्यक्ती रूण येथे खवले विकण्यासाठी येत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार लगेचच सापळा रचण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जितेंद्र चव्हाण खवले घेऊन आला.
जी व्यक्ती खवले विकत घेणार होती, त्या व्यक्तीची तो वाट पाहत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे दहा किलो खवले सापडले आहेत. त्याला तातडीने लांजा पोलीस स्थानकात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या मोहिमेत गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार माने, पी. एन. दरेकर, हेडॉन्स्टेबल बागणे, डोमणे, झोरे, बाभूळ, भोसले, पालकर, दत्ता कांबळे हे सहभागी झाले होते. औषधी गुणधर्म असल्याने या खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठी मागणी आहे. लांजात करण्यात आलेल्या या कारवाईत जप्त करण्यात आलेले खवले लाखो रूपये किमतीचे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.