काम न करणाऱ्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा : प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:24 PM2024-03-04T12:24:41+5:302024-03-04T12:26:37+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडून देऊनही काहीही काम केलेले नाही, अशांना आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवायचा ...

Teach those who are not working a lesson in the upcoming Lok Sabha elections says Chief Minister of Goa Pramod Sawant | काम न करणाऱ्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा : प्रमोद सावंत

काम न करणाऱ्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा : प्रमोद सावंत

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडून देऊनही काहीही काम केलेले नाही, अशांना आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवायचा आहे. त्यासाठी आम्हा सर्वांची एकी महत्त्वाची आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी आपल्याला त्रास दिला आहे, आता त्यांना धडा शिकवायचा आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे क्लस्टर प्रमुख आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

भाजपच्या दक्षिण रत्नागिरीतर्फे रविवारी शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात भाजप कार्यकर्ता संमेलनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या संमेलनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी शिंदे गट आणि अजित पवार गट यांना बरोबर घेऊन जायचे आहे, असे स्पष्ट केले. या लोकसभा मतदारसंघाचा विकास करावयाचा असेल तर मोदींनी दिलेले प्रकल्प, योेजना येथे राबवायला पाहिजेत. ते कोणी राबविले नाहीत, या विकासाच्या आड कोण आले, हे लोकांसमोर सांगायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मोदींनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला प्रकल्प दिलेला आहे. मोदी देत असतानाही येथील खासदाराने काय काम केले. प्रकल्प का आणला नाही, अशी त्यांना विचारणा करा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. काँग्रेसने केवळ पाट्या लावण्याचे काम केले. मात्र, मोदींनी पाट्याही लावल्या आणि त्या प्रत्येक प्रकल्पाचे उद्घाटनही केले, असेही ते म्हणाले.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळ माने, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, ॲड. बाबासाहेब परुळेकर, बाळासाहेब पाटील, सतीश शेवडे, राजन फाळके व अन्य पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

घाेटाळ्यावर बाेलताना भीती

काँग्रेसने सर्वच बाबतीत घोटाळा केलेला आहे. मात्र, त्या घोटाळ्यांवर बोलताना भीती वाटते. कारण त्यापैकी बरेचजण आपल्याकडे आलेले आहेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

..तेव्हाच महामार्ग पूर्ण हाेणार

मुंबई-गाेवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, आपला खासदार आल्यानंतरच मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: Teach those who are not working a lesson in the upcoming Lok Sabha elections says Chief Minister of Goa Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.