उत्पन्नाच्या दाखल्यावर सहीसाठी २० हजारांची लाच घेताना तलाठ्यास अटक, दापोलीत 'लाचलुचपत'ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:43 IST2025-06-11T16:42:22+5:302025-06-11T16:43:09+5:30
पंधरा दिवसांत दुसरा तलाठी अडकला

उत्पन्नाच्या दाखल्यावर सहीसाठी २० हजारांची लाच घेताना तलाठ्यास अटक, दापोलीत 'लाचलुचपत'ची कारवाई
दापोली : उत्पन्नाच्या दाखल्यावर सही व शिक्का देण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या केळशी (ता. दापाेली) येथील तलाठ्याला रत्नागिरीच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली . राजेंद्र उंडे असे तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे मांदिवली येथील अतिरिक्त कार्यभारही आहे.
याबाबत ४९ वर्षीय प्राैढाने रत्नागिरी लाचलुचपत विभागाकडे ५ जून राेजी तक्रार दिली हाेती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार केळशी सजातील तलाठी राजेंद्र उंडे याने उत्पन्नाच्या दाखल्यावर सही व शिक्का देण्यासाठी २० हजारांची मागणी केली हाेती. ही लाच मंगळवारी स्वीकारण्याचे त्याने मान्य केले हाेते.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली केळशी येथे सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान तक्रारदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारताच राजेंद्र उंडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील गुन्हा नोंदणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
सापळा पथकात सहायक फौजदार चांदणे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर, महिला हवालदार श्रेया विचारे, महिला काॅन्स्टेबल समिता क्षीरसागर, चालक पाेलिस नाईक प्रशांत कांबळे यांचा समावेश हाेता.
पंधरा दिवसांत दुसरा तलाठी अडकला
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील तलाठ्याला २७ मे राेजी लाच घेताना पकडण्यात आले हाेते. त्याने जमिनीची फेरफार नाेंद करून तसा सात-बारा करून देण्यासाठी ३० हजारांची लाच घेतली हाेती. त्यानंतर आता दापाेली तालुक्यात तलाठी लाच घेताना सापडला आहे.