Ratnagiri: रायपाटण येथे वृद्ध महिलेचा घरातच संशयास्पद मृत्यू, अंगावरील दागिने गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:35 IST2025-10-16T19:34:46+5:302025-10-16T19:35:09+5:30
घातपाताची शंका

Ratnagiri: रायपाटण येथे वृद्ध महिलेचा घरातच संशयास्पद मृत्यू, अंगावरील दागिने गायब
राजापूर : तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे ७४ वर्षीय महिलेच्या आकस्मिक मृत्यूने परिसर हादरला आहे. घरात एकटीच राहणारी ही महिला बुधवारी मृतावस्थेत आढळली. त्यांचा देह काळा पडला हाेता तसेच अंगावरील दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने त्यांचा घातपात झाला आहे का, हे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. वैशाली शांताराम शेटे, असे या मृत महिलेचे नाव आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी श्वान पथकासह, फॉरेन्सिकची टीम आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी पाचारण केले. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी, लांजा-राजापूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत मार्गदर्शन केले.
वैशाली शांताराम शेटे रायपाटण टक्केवाडीमध्ये त्यांच्या घरी एकट्याच राहतात. त्यांना सोमवारी वाडीमधील ग्रामस्थांनी पहिले होते. त्या रात्रीपासून त्यांच्या घरातील लाईटही बंद होता. मंगळवारीही त्या दिसल्या नव्हत्या. त्यामुळे बुधवारी सकाळी वाडीतील एका महिलेने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला; पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जोरात दरवाजा लोटला असता तो उघडला गेला आणि आत जावून पाहिले असता घरात वैशाली शेट्ये या मृतावस्थेत पडलेल्या होत्या. त्यांचा देह काळा पडला होता.
ही माहिती समजताच आजूबाजूचे ग्रामस्थ तेथे जमले. लगतच असलेल्या रायपाटण पोलिस दूरक्षेत्राला माहिती दिली. काही वेळातच रायपाटण पोलिस दूरक्षेत्रचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राजापूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक अमित यादव, उपविभागीय अधिकारी सुरेश कदम तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही रायपाटणमध्ये दाखल झाले.
श्वानपथकाला अडचणी
घटना गंभीर असल्याने लगेचच श्वानपथक, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक) पथक घटनास्थळी बोलाविण्यात आले. मात्र, मृतदेह काहीसा सडलेल्या अवस्थेत असल्याने श्वान पथकालाही अडचणी आल्या.
चोरीसाठी घातपात?
मृत वैशाली शेट्ये यांच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि कानात रिंग गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने त्यांचा घातपात करण्यात आला आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. सायंकाळी उशिरा मृतदेह विच्छेदनासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.