रत्नागिरीतील उद्यमनगर येथील घरफोडीचा छडा, संशयित पोलिसांच्या ताब्यात
By मनोज मुळ्ये | Updated: February 29, 2024 15:29 IST2024-02-29T15:28:32+5:302024-02-29T15:29:25+5:30
रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथील पडवेकर काॅलनीत झालेल्या घरफाेडीप्रकरणाचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या चाेरीप्रकरणी पाेलिसांनी बुधवारी ...

रत्नागिरीतील उद्यमनगर येथील घरफोडीचा छडा, संशयित पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथील पडवेकर काॅलनीत झालेल्या घरफाेडीप्रकरणाचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या चाेरीप्रकरणी पाेलिसांनी बुधवारी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चाेरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. लियाकत अब्दुल्ला नावडे (४५, रा. कोकण नगर बगदादी चौक, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव असून, त्यांच्यावर जिल्ह्यात चाेरी, घरफाेडीचे ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती समाेर आली आहे.
पडवेकर काॅलनीतील एक कुटुंब दिनांक १९ ते दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत बाहेरगावी गेले हाेते. ही संधी साधून चोरट्याने त्यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरुन नेले हाेते. या चाेरीप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. त्यानंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी तपासासाठी एक पथक तयार करून शाेध सुरु केला.
या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू असतानाच रेकॉर्डवरील अट्टल आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे याने ही चाेरी केल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लियाकत अब्दुल्ला नावडे या ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच या गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा पाेलिसांनी जप्त केली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पाेलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, सागर साळवी, महिला पाेलिस हेडकाॅन्स्टेबल वैष्णवी यादव व पाेलिस नाईक दत्ता कांबळे यांनी केली.