रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांचेही सर्वेक्षण होणार - मंत्री उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:11 IST2025-11-01T17:11:29+5:302025-11-01T17:11:55+5:30
राज ठाकरे यांच्यावर टीका

रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांचेही सर्वेक्षण होणार - मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : जिल्ह्यातील वादळामुळे झालेले भातशेती, नाचणी पिकांसह मच्छीमारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेती, तसेच मच्छीमारांची जाळी, नौका यांचेही सर्वेक्षण करण्यात येऊन त्यांना शासनाकडून नुकसानासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेला कर्जमाफी व नुकसानभरपाईचा निर्णय हा बळीराजासाठी दिलासा देणारा आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर नुकसानाची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, मच्छीमारांची जाळी, नौका, सुकवलेले मासे यांचे सर्वेक्षण करण्याबाबत मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. त्यांना मच्छीमारांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्यासह खासदार नारायण राणेही महायुतीसाठी आग्रही आहेत. महायुती म्हणूनच निवडणुका लढवाव्यात, अशी आमची आग्रही भूमिका असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्यावर टीका
ज्या काँग्रेसने शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या महाविकास आघाडीबरोबर मनसे अध्यक्ष जात आहेत, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा, तसेच राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, त्या महाविकास आघाडीबरोबर जाताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किल्ल्याचा इतिहास काय आहे, हे व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
नमो उपक्रम कशासाठी?
नमो उद्यानाबाबत राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली जात आहे. जागतिक वारसा स्थळे ज्या किल्ल्यांना दर्जा लाभला आहे, अशा किल्ल्यांमध्ये चांगल्या प्रकारची यंत्रणा उभी राहिली पाहिजे आणि पर्यटकांना त्या किल्ल्याच्या परिसराची माहिती मिळाली पाहिजे, त्यासाठीच हा नमो उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदार याद्यांबद्दल जी चर्चा चालली आहे, ती फेक नरेटिव्ह आहे. त्यामुळे त्यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.