मुंबईतून पर्यटनासाठी रत्नागिरीत आलेल्या महिलेचा आकस्मिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:30 IST2025-05-19T16:29:55+5:302025-05-19T16:30:59+5:30
रत्नागिरी : मुंबईतून पर्यटन व देवदर्शनासाठी रत्नागिरीत आलेल्या महिलेचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. नीता नरेंद्र ...

मुंबईतून पर्यटनासाठी रत्नागिरीत आलेल्या महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी : मुंबईतून पर्यटन व देवदर्शनासाठी रत्नागिरीत आलेल्या महिलेचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. नीता नरेंद्र मेस्त्री (४९, रा. नालासोपारा, पालघर, जि. रायगड, मूळ रा. देवाचे गोठणे, ता. राजापूर) असे या महिलेचे नाव आहे.
नीता मेस्त्री या त्यांची दोन मुले, दोन बहिणींच्या कुटुंबीयांसह गुरुवारी रत्नागिरीत देवदर्शनासाठी आल्या होत्या. ते रत्नागिरी शहरातील माळनाका येथील एका हॉटेलमध्ये राहत होते. शुक्रवारी सकाळी आपल्या मूळ गावी देवाचे गोठणे येथे जाऊन आले.
रात्री जेवण करुन सर्वजण झोपले होते. शनिवारी पहाटे सहाच्या सुमाराला नीता या घोरत होत्या. मात्र, अचानक त्यांचे घोरणे बंद झाले म्हणून नातेवाइकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. पण, त्या बेशुद्ध पडल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले.
तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.