आरोग्य विभागाच्या भाेंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:39+5:302021-09-26T04:34:39+5:30

रत्नागिरी : आरोग्य विभागाची शनिवारी व रविवारी हाेणारी परीक्षा अचानक स्थगित केल्याने सुशिक्षित बेरोजगार असलेल्या परीक्षार्थींनी तीव्र संताप ...

Students hit by mismanagement of health department | आरोग्य विभागाच्या भाेंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

आरोग्य विभागाच्या भाेंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

रत्नागिरी : आरोग्य विभागाची शनिवारी व रविवारी हाेणारी परीक्षा अचानक स्थगित केल्याने सुशिक्षित बेरोजगार असलेल्या परीक्षार्थींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही परीक्षा आरोग्य क आणि ड विभागासाठी घेण्यात येणार होती. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ३२ परीक्षा केंद्रांवर सुमारे ६,५०० परीक्षार्थी परीक्षेला बसणार होते.

राज्यात शनिवारी २५ आणि रविवारी २६ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, संबंधित कंपनीच्या असमर्थतेमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी रात्री अचानक ही परीक्षा स्थगित करण्यात आल्याने परीक्षार्थींसह त्यांचे पालकही संतप्त झाले आहेत.

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यांतील सुशिक्षित बेरोजगार रत्नागिरी जिल्ह्यातून परीक्षेला बसले होते. त्याबरोबर हजारो परीक्षार्थी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत दाखल झाले होते. तर, अन्य जिल्ह्यांतील अनेक परीक्षार्थी रत्नागिरीत येण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यांनाही रात्री उशिरा परीक्षा स्थगित झाल्याचे समजताच ते माघारी परतले.

जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या गट-क च्या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रांवर सुमारे ३,००० परीक्षार्थी तर रविवारी होणाऱ्या गट-ड च्या परीक्षेसाठी १५ केंद्रांवर सुमारे ३,५०० परीक्षार्थी परीक्षेला बसणार होते. या परीक्षेची पूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, परीक्षा अचानक स्थगित झाल्याने सर्वच परीक्षा केंद्रांवर शुकशुकाट होता.

-------------------------------------

मासू संघटनेकडून निषेध

विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे रात्री उशिरा घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यात विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले असून शैक्षणिक व आर्थिक नुकसानदेखील झालेले आहे. याचा महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) या संघटनेने निषेध केला आहे.

Web Title: Students hit by mismanagement of health department