वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल साडेदहा कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:13 IST2025-09-04T14:12:54+5:302025-09-04T14:13:08+5:30
घरे, गोठे, दुकाने, सार्वजनिक मालमत्ता बाधित; तीन बळी, १२ जनावरांचा मृत्यू

वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल साडेदहा कोटींचे नुकसान
रत्नागिरी : मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात मालमत्ता व शेतीचे नुकसान केले. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी सुरू झालेल्या वादळी पावसानेही जिल्ह्यातील घरे, गोठे, जनावरे आणि सार्वजनिक मालमत्ता बाधित झाल्या आहेत. ११९.७३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
गेल्या साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात सुमारे १० कोटी ६३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, तिघांचा बळी गेला आहे. १२ जनावरे दगावली आहेत. यंदा २० मेपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मे महिन्यातच पडझडीला प्रारंभ झाला होता. जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमी होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून, साधारणत: १३ ऑगस्टपासून पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे.
त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमी पडला असला तरी मे महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. आताही पावसाचे सातत्य कायम आहे. जोडीला वाऱ्याचा जोर असल्याने घरे, गोठे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून अजूनही वर्तविली जात आहे.
गेल्या साडेतीन महिन्यांत पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घर, गोठे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तांचे आणि शेतीचे नुकसान केले आहे. ३ व्यक्तींचा बळी गेला. ९ जण जखमी, तर १२ जनावरे दगावली आहेत. तसेच ३९२ शेतकऱ्यांच्या ११९.७३ हेक्टरवरील शेतीचे १० लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम १० कोटी ६२ लाख ५४ हजार ७७९ इतकी आहे.
जिल्ह्यात साडेतीन महिन्यांत झालेले नुकसान
- बाधित घरे (४३८) : ३,५१,५५,८३३
- बाधित गोठे (९४) : ४१,७१,८२६
- सार्वजनिक मालमत्ता (१३५)
- शाळा (१५) : २७,४०,७००
- अंगणवाडी (३) : ४,६८,८२५
- रस्ते व संरक्षक भिंत : (३९) : २,७६,११,०००
- पूल व मोऱ्या (६) : ६,६०,०००
- साकव (६) : १,४५,५०,०००
- इमारती (९) : ५,७२,७५०
- विहिरी (४) : ७ ५०,०००
- महावितरण (५६) : १८,६१,०००
- पोल (५२) : १२,५१,०००
- रोहित्र (४) : ६,१०,०००
- शेती (११९.७३ हेक्टर) : १०,४९,०००