रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये फूट, राजकीय समीकरणे बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:48 IST2025-11-18T15:48:06+5:302025-11-18T15:48:58+5:30
Local Body Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगराध्यक्षपदासह १२ उमेदवार रिंगणात

रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये फूट, राजकीय समीकरणे बदलली
रत्नागिरी : येथील महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूच्या राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत रत्नागिरीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तुतारी बाजूला करून घड्याळ हातात घातले. त्यांनी नगराध्यक्षपदासह १२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरी शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे रविवारी महाविकास आघाडी जाहीर झाली आणि अचानक सोमवारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. बशीर मुर्तुझा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार) मोट बांधली.
बशीर मुर्तुझा यांनी महाविकास आघाडीकडून आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची मागणी केली होती; मात्र त्यापूर्वीच उद्धवसेनेचे उपनेते व माजी आमदार बाळ माने यांनी या पदावर आपल्या सुनेसाठी दावा केला होता. त्याचवेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनीही आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी उद्धवसेनेला निश्चित केल्यानंतर तिन्ही घटक पक्षांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये जागा वाटप निश्चित करण्यात आले.
त्यानंतर अचानक मुर्तुझा यांनी उमेदवारी अर्जाची शेवटच्या दिवशी १७ रोजी आपल्या भूमिकेमध्ये बदल करून तुतारीला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्यासोबत अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आणि शहरातील इतर पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये कोणताही गाजावाजा न करता सरळ रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी आणि १२ नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे बदलली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर रत्नागिरी शहरासह तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार यांच्यासाेबतच राहिले. मोजक्याच लोकांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. मात्र, रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अचानक राजकीय समीकरणे बदलली आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडून अनेकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मार्ग धरला आहे.