Ratnagiri Crime News: आई म्हणाली, मसाला तयार कर; मुलाने डोक्यात घातला वरवंटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:37 IST2026-03-10T13:37:23+5:302026-03-10T13:37:46+5:30
घाबरला अन् पाेलिसांकडे धावला, पाेलिसांनी तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले

Ratnagiri Crime News: आई म्हणाली, मसाला तयार कर; मुलाने डोक्यात घातला वरवंटा
लांजा : ‘कोळंबीसाठी मसाला तयार कर,’ सांगितल्याचा राग आल्याने मुलाने वयोवृद्ध आईच्या डोक्यात वरवंटा घातल्याची घटना लांजातील धावणेवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून, पाेलिसांनी तातडीने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले.
सुनीता गणपत दिवाळे (वय ७०) असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. त्या मुलगा संतोष गणपत दिवाळे (वय ३५) यांच्या समवेत राहतात. संतोष याला दारूचे व्यसन असल्याने त्याचे व आईचे नेहमी वाद होत हाेते. संतोष याने रविवारी सायंकाळी बाजारातून कोळंबी आणली होती. आईने ती साफ केल्यानंतर त्यांनी मुलाला ‘तू मसाल्याचे वाटत तयार कर,’ असे सांगितले. याचा मुलाला राग आला आणि त्याने मसाला वाटप करण्याचा वरवंटा आईच्या डोक्यात मारला. त्यानंतर त्याने शर्टाने तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमिनीवर रक्ताचा सडा आणि आई निपचित पडल्याचे पाहून ताे घाबरला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अमोद सरंगले, उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र रेवणे, नितेश राणे, महिला पोलिस प्रियांका कांबळे, उर्मिला शेडे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, लांजा प्रभारी निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. पाेलिसांनी तातडीने जखमी वृद्धेला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तिथून पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी संताेष गणपत दिवाळे याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड या करीत आहेत.
घाबरला अन् पाेलिसांकडे धावला
संतोष याला दारूचे व्यसन होते. मात्र, गेले तीन दिवस तो दारू प्यायला नव्हता. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या आईला पाहून ताे घाबरला. आजूबाजूला वस्ती नसल्याने मदतीला बोलवायचे काेणाला, असा प्रश्न त्याला पडला. त्याने लांजा पोलिस स्थानक गाठले व घडलेल्या घटनेची पोलिसांनी माहिती दिली. त्यामुळे पाेलिस तातडीने घटनास्थळी पाेहाेचले. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धेचा जीव वाचला.