Ratnagiri: चालत्या रेल्वेतून तोल जाऊन पडलेल्या वृद्धासाठी जवान ठरले जणू 'देवदूत'च
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:20 IST2025-11-25T14:20:00+5:302025-11-25T14:20:40+5:30
मडगाव येथील कोकण रेल्वेच्या सुरक्षा बलाची सतर्कता

Ratnagiri: चालत्या रेल्वेतून तोल जाऊन पडलेल्या वृद्धासाठी जवान ठरले जणू 'देवदूत'च
रत्नागिरी : मडगाव (गोवा) स्थानकावर चालत्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी तोल गेल्याने रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या कोकण रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या जवानांनी बाका प्रसंग ओळखून पुढे होऊन त्या प्रवाशाला वाचविले. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेचे दर्शन घडवत त्या प्रवाशाला साक्षात मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणले.
मडगाव (गोवा) स्थानकावर २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून जात असताना तिचा वेग मंदावल्याचे पाहून या रेल्वेमधील एक प्रवासी घाईघाईने उतरण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे आणि प्लॅटफाॅर्म यांच्यामध्ये पडला. यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान कपिल सैनी आणि आर. एस. भाई यांनी डोळ्याचे पाते लवते न लवते तोच पुढे धाव घेऊन प्रवाशाला सुरक्षित वर घेत त्याचे प्राण वाचविले.
या जवानांच्या साहसी व प्रशंसनीय कार्याची दखल घेत, कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांनी दोन्ही आरपीएफ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. या प्रवाशाने आपला प्राण वाचविणाऱ्या कोकण रेल्वेच्या आरपीएफ जवानांचे आभार मानले.
प्रवाशांनी काळजी घ्यावी
प्रवाशांनी चालत्या रेल्वेमध्ये चढू नये किंवा उतरू नये. अशा कृती जीव आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करतात. प्रवाशांना रेल्वे परिसरात असताना सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.