रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्ड पुरस्कृत निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रशिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य महाविद्यालय येथे दि. २८ ते ३० सप्टेंबरअखेर ‘निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रशिक्षण नि:शुल्क असून, प्रशिक्षणार्थींची निवड ही महाराष्ट्रातील प्रधानमंत्री मस्यसंपदा योजेनेचे लाभधारक आणि संभाव्य कोळंबी संवर्धकातून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींची संख्या ५० पर्यंत सीमित आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातील सैधांतिक आणि प्रात्याक्षिक वर्गासाठी उपस्थिती आवश्यक असून, त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्प भेटीव्दारे प्रकल्प रचना आणि कोळंबी संवर्धन व्यवस्थापनाची माहिती घेता येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नाव-नोंदणीसाठी डॉ. अनिल पावसे किंवा डॉ. सुरेश नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.