राजांचा अपमान करा, सुरक्षा मिळवा; सरकारने नवी योजना सुरु केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:39 IST2025-03-17T15:38:31+5:302025-03-17T15:39:06+5:30
भाजपने शिवाजी महाराजांची समाधी १९८ वर्षे लपवून ठेवली

राजांचा अपमान करा, सुरक्षा मिळवा; सरकारने नवी योजना सुरु केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
रत्नागिरी : भाजपने शिवाजी महाराजांची समाधी १९८ वर्षे लपवून ठेवली. कारण येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजू नये. आता हेच सरकार शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सुरक्षा पुरवीत आहेत. त्यामुळे राजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा, अशी नवी योजना या सरकारने सुरू केल्याचा आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी येथे केला. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
महायुतीच्या सरकारच्या हेक्याची किंमत सर्व समाजाला चुकवावी लागत आहे. त्यामध्ये शेतकरी, मजूर आहेत. बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या कुटुंबातील लेकीही सुरक्षित नाहीत, १० लाख लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित ठेवणे, अशा अनेक मुद्द्यावर भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळू नये यासाठी त्यांची समाधी तब्बल १९८ वर्षे लपवून ठेवली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना सरकार सुरक्षा पुरवून त्यांना पाठिशी घालत आहे, असा आराेप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामागे काेण आका हाेता ते जनतेने पाहिले, आता आकानंतर खाेक्या आला आहे, असा आराेपही त्यांनी यावेळी केला. एक मंत्री खाेटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दाेषी ठरला आहे.
तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री राेज बेताल वक्तव्य करुन राज्यातील शांतता व साैहार्दला छेद देत असल्याचा आराेप करुन त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.
हे गँग ऑफ सरकार
टोळ्या एकत्र येऊन राज्यातील हे महायुतीचे सरकार स्थापन झाल्याने मंत्र्यांमध्ये बेबनाव आहे. त्यामुळे गँग ऑफ वासेपूर चित्रपटाप्रमाणे हे गँग ऑफ सरकार, असा खेळ महाराष्ट्रात सुरू आहे. त्याची किंमत जनतेला मोजावी लागत असल्याचा आराेपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला