कोकरे महाराजावर विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल, पहिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:22 IST2025-10-17T12:21:12+5:302025-10-17T12:22:38+5:30
३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली

कोकरे महाराजावर विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल, पहिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी
खेड (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील लोटे येथील भगवान कोकरे महाराज याच्यावर अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची दुसरी तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीनंतर खेडपोलिसांनी भगवान कोकरे महाराज, त्याचे सहकारी शिक्षक प्रीतेश कदम आणि पीडित मुलीच्या आत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना दि. १६ ऑक्टोबर २०२४ ते १८ जून २०२५ या कालावधीत घडली. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार कोकरे महाराजाकडून तिचा वारंवार विनयभंग करण्यात आला. या प्रकरणात प्रीतेश कदम आणि आपल्या आत्याचा सहभाग असल्याचे तिने नमूद केले आहे. खेड पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पहिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी
विनयभंगाच्या पहिल्या गुन्ह्यात कोकरे महाराज आणि प्रीतेश कदम यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आता त्यांना दि. ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.