Ratnagiri: खेडमध्ये दुचाकीसह वाहून जाणाऱ्या शिक्षिकेला रेस्क्यू टीमने वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:16 IST2025-07-16T14:15:18+5:302025-07-16T14:16:12+5:30

मुसळधार पावसामुळे शाळेला सुट्टी देण्यात आल्याने ही शिक्षिका आपल्या घरी निघाली होती

Rescue team saves teacher who was swept away with bike in Khed | Ratnagiri: खेडमध्ये दुचाकीसह वाहून जाणाऱ्या शिक्षिकेला रेस्क्यू टीमने वाचवले

Ratnagiri: खेडमध्ये दुचाकीसह वाहून जाणाऱ्या शिक्षिकेला रेस्क्यू टीमने वाचवले

खेड : जगबुडी नदीच्या पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने एक शिक्षिका दुचाकीसह पाण्यात अडकल्याचा प्रकार मंगळवारी खेडमध्ये घडला. पाण्याचा वेग वाढल्यामुळे ती दुचाकीसह वाहून जात असल्याचे दिसताच अल सफाच्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तिला दुचाकीसह सुरक्षित बाहेर काढले. अल सफा टीमचे सर्फराज पांगरकर, एजाज खेडेकर, सलील जुईकर धाडसाने पाण्यात उतरल्याने अनर्थ टळला.

जगबुडी नदी किनारी भोस्ते पुलापासून मच्छी मटण मार्केट ते देवणे बंदर असा खाडी पट्ट्यात तसेच बाजारपेठेत जाणारा मार्ग आहे. नदीच्या पाण्यात वाढ झाल्यास पुराचे पाणी या रस्त्यावर येते आणि रस्ता पाण्याखाली जातो. मंगळवारी एक शिक्षिका सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाळेतून कुवारसाई येथील आपल्या घरी दुचाकीने निघाली होती.

रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळेला सुट्टी देण्यात आल्याने ही शिक्षिका आपल्या घरी निघाली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती अडकून राहिली. दरम्यान पाण्याचा वेग वाढल्याने ती गाडीसह वाहून जावू लागली. खेडमधील अल सफा रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्या महिलेला पाहिले. तत्काळ ते पाण्यात उतरले आणि तिला सुरक्षित जागी आणले.

पोलिस नसल्यामुळे..

मुसळधार पावसात जगबुडी नदी काठावरील हा रस्ता नेहमीच पाण्यात जातो. त्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात येते. मात्र या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नसल्याने पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरही गाडी घालण्याचे धाडस अनावधानाने दुचाकीस्वार करतात. यामुळे पुराच्यावेळी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

Web Title: Rescue team saves teacher who was swept away with bike in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.