हापूसमुळे रत्नागिरी जिल्हा देशात पहिला; ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:21 IST2025-07-15T16:18:04+5:302025-07-15T16:21:33+5:30
दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले

हापूसमुळे रत्नागिरी जिल्हा देशात पहिला; ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी
रत्नागिरी : ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या १४ जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी लागली आहे. यात रत्नागिरीच्या हापूस आंब्याने ‘सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा’ म्हणून रत्नागिरीला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला असून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. नाशिक, अमरावती, नागपूर आणि अकोला हे अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकाचे विजेते ठरले आहेत. दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले.
‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन’च्या माध्यमातून देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडून त्या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग करणे व प्रोत्साहन देणे, जेणेकरून देशांतील संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळेल व देशभरामध्ये समग्र सामाजिक व आर्थिक वाढ शक्य होईल, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम देशामध्ये राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावरून केलेल्या भौतिक पडताळणीमध्ये महाराष्ट्रातून नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अहिल्यानगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे व गोंदिया या १४ जिल्ह्यांची निवड झाली होती.
भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सहव्यवस्थापक ताशी डोज शेर्पा यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत ‘हापूस आंबा’ या उत्पादनाशी निगडित उद्योगांना भेट देऊन आढावा घेतला होता. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सादरीकरण केले होते.
अखेर रत्नागिरी जिल्ह्याच्या हापूसने देशात प्रथम पुरस्कार मिळवत जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. सोमवारी (दि. १४ जुलै) दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रेखा गुप्ता, राज्याच्या वाणिज्य व उद्योग विभागाचे मंत्री जतीन प्रसाद उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक हणबर, आताचे महाव्यवस्थापक अजिंक्य आसगेकर, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा पणन अधिकारी मिलिंद जोशी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संकेत कदम यांनीही योगदान दिले.