रत्नागिरी, सिंधुदुर्गला तीन मंत्रिपदे; उदय सामंत, नितेश राणे यांना कॅबिनेट, योगेश कदम राज्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:06 IST2024-12-16T12:05:23+5:302024-12-16T12:06:49+5:30
रत्नागिरी / सिंधुदुर्ग : प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुतीने कोकणाच्या पदरात झुकते माप टाकले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ...

रत्नागिरी, सिंधुदुर्गला तीन मंत्रिपदे; उदय सामंत, नितेश राणे यांना कॅबिनेट, योगेश कदम राज्यमंत्री
रत्नागिरी / सिंधुदुर्ग : प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुतीने कोकणाच्या पदरात झुकते माप टाकले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. शिंदेसेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रिमंडळात निवड झाली आहे. याखेरीज शिंदेसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण खाते आणि महायुतीच्या सत्तेत उद्योग खाते भूषविणारे उदय सामंत यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात दोनवेळा त्यांना कॅबिनेट मंत्रिपद, तर एकदा राज्यमंत्रिपद मिळाले. राजकारणातील अनुभवामुळे ते यावेळेच्या मंत्रिमंडळातही असणार हे निश्चित होते. त्यानुसार त्यांनी शपथ घेतली. त्यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे आमदार योगेश कदम यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. २०१९ साली प्रथम आमदार झालेल्या योगेश कदम यांना आपल्या दुसऱ्या टर्ममध्येच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
रत्नागिरी आणि दापोलीमध्ये शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि पेढे, लाडू वाटून जोरदार जल्लोष केला. दाेन्ही ठिकाणी मोठ्या पदड्यावर शपथविधी पाहण्याची सोय करण्यात आली होती.
रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपचे अभ्यासू व आक्रमक नेते नितेश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. तेही कॅबिनेट मंत्री म्हणून. महाराष्ट्रातील एक आक्रमक हिंदुत्ववादी नेता अशी ओळख नितेश राणेंची आहे. आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नितेश राणे यांच्या रूपाने राणे पर्व पुन्हा एकदा सुरू झाले आहे.
उत्साहाचे वातावरण !
आमदार नितेश राणे तिसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर १०० टक्के कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असा विश्वास सर्वसामान्य जनतेमध्ये होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. आता कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत भाजपचे एकमेव आमदार असलेल्या नितेश राणेंना मंत्रिपद मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये व सर्वसामान्य जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.