Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:59 IST2025-11-12T19:58:01+5:302025-11-12T19:59:44+5:30
राजापूर तालुक्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नीची जंगलमय भागात नेऊन हत्या केली. त्यानंतर माझ्या पत्नीला भूत गेल्याचे सांगितले होते. पण, तपासात काही वेगळेच समोर आले.

Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
Ratnagiri Crime : 'माझ्या पत्नीला भुताने उचलून नेऊन मारले,' असा कांगावा करून तो मी नव्हेच, असे भासवणाऱ्या पतीनेच तिचा खून केल्याचे पुराव्यात उघड झाले. या खुनाच्या आरोपाखाली परिस्थितीजन्य पुराव्यांवर विश्वास ठेवत न्यायालयाने गजानन जगन्नाथ भोवड (४५, रा. परुळे, सुतारवाडी, ता. राजापूर) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गजानन भोवड याने २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्नी सिद्धी हिला 'तुला तुझ्या बहिणीकडे घेऊन जातो,' असे सांगून परुळे, सुतारवाडी येथील जंगलमय ठिकाणी नेले होते.
पत्नीची नाक आणि तोंड दाबून हत्या
त्यानंतर, त्याने तिचे नाक आणि तोंड हाताने दाबून ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तेथील गवतात लपवून ठेवला होता. त्यानंतर, आरोपीने पोलिसांना पत्नीच्या मरणाबाबत खोटी खबर दिली होती.
त्याने आपल्या पत्नीला भुताने नेऊन मारल्याचा बनावही केला होता. त्याने पत्नीचा खून केल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार, भारतीय दंडविधान कलम ३०२, २०१ आणि १७७ नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
आरोपीला जन्मठेप
या खटल्यात डॉ. अजित गणपत पाटील, डॉ. विनोद चव्हाण, पंच सतीश शिंदे आणि मयत सिद्धीची बहीण सोनाली शिंदे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
सत्र न्यायाधीश ओ.एम. आंबाळकर यांच्या न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद चालला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.