रत्नागिरीत पावसाचा शिडकावा; आजही हलक्या सरींची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:45 IST2025-05-09T13:45:07+5:302025-05-09T13:45:50+5:30

बागायतदार, मच्छीमार धास्तावले

Rainfall in Ratnagiri district for the last two days | रत्नागिरीत पावसाचा शिडकावा; आजही हलक्या सरींची शक्यता

संग्रहित छाया

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाने वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळी रत्नागिरी शहरासह अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी काेसळल्या. मात्र, काही वेळातच पुन्हा कडाक्याचे ऊन पडले हाेते. सायंकाळी मात्र पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले हाेते. शुक्रवारीही जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री रत्नागिरी परिसरातील काही गावांमध्ये पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. यात काही घरांवर झाडे कोसळल्याने नुकसान झाले.गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून आले, आणि काही वेळातच जोरदार वाऱ्यासोबत पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा मिनिटे पाऊस पडत होता. त्यानंतर मधूनच मेघगर्जनाही होत होती. मात्र, काही वेळानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले.

दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण होते. तरीही तापमान ३४.४ अंश सेल्सिअस इतके होते. हवेत दमटपणाही होता. ७३ टक्के आर्द्रता असल्याने उकाड्यातही वाढ झाली हाेती. गुरुवारी सायंकाळी पुन्हा ढग भरून आल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली हाेती. वाऱ्याचाही जोर होता. हवामान खात्याने शुक्रवारीही पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविली असून, दि. १३ मेपर्यंत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

बागायतदार, मच्छीमार धास्तावले

आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असला तरी काही ठिकाणी उशिराने फळधारणा झाली आहे. त्यामुळे काहींनी अजून आंबा झाडावरून काढलेला नाही. आता अधूनमधून पाऊस पडू लागल्याने बागायतदार धास्तावले आहेत. तसेच किनाऱ्यावरही जोरदार वारे वाहत असल्याने मच्छिमारीही अडचणीत आली आहे.

Web Title: Rainfall in Ratnagiri district for the last two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.