रत्नागिरी : भारतीय किनारपट्टीवर स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यामागचा उद्देश केवळ समुद्रकिनारे स्वच्छ करणेच नव्हे तर किनारपट्टीचे क्षेत्र समुद्री प्रदूषण, कचऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सागरी परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी सामान्य लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा आहे, असे प्रतिपादन भारतीय तटरक्षक दलाचे उप समादेशक सचिन सिंग यांनी केले.
येथील भारतीय तटरक्षक दलातर्फे शनिवारी रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये बीचवर आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे आयोजन केले होते. यावर्षी कार्यक्रमाचे उद्दिष्ट लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे पेरणे आणि समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणाचे नाजूक संतुलन अबाधित राखणे हे होते. संगीता कुमार (उपाध्यक्ष, तटरक्षक, रत्नागिरी) यांच्या हस्ते ध्वज दाखवून भाट्ये बीच येथे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक उप समादेशक सचिन सिंग यांनी या मोहिमेबद्दल माहिती करून देताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सांगितले. भारतीय तटरक्षक दल यानिमित्ताने २००५ सालापासून भारतीय किनारपट्टीवर अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारतीय तटरक्षक दल, सैन्य अभियंता सेवा, सागरी पोलीस, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) आणि नगर परिषदेचे कर्मचारी स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी झाले होते. प्रामुख्याने प्लास्टिकच्या बाटल्या, टिन, जाळी, दोरखंड, खाद्यपदार्थांचे रॅपर आदी स्वरूपाचा एकूण १.५ टन कचरा संकलन करण्यात आला.
भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक नीरज सिंग, उपमहानिरीक्षक दुष्यंत कुमार, कर्नल विश्वास पी. यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. उपक्रम पार पाडताना कोरोनाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्यात आले होते.
.....
फोटो मजकूर
रत्नागिरीतील तटरक्षक दलातर्फे रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्र किनाऱ्यावर शनिवारी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत दीड टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.