मान्सूनपूर्व 'जोर'धारेने जूनच्या पूर्वार्धातच रत्नागिरी जिल्ह्यातील ९ धरणे तुडुंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:30 IST2025-06-11T17:28:34+5:302025-06-11T17:30:18+5:30
२३ धरणांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा

मान्सूनपूर्व 'जोर'धारेने जूनच्या पूर्वार्धातच रत्नागिरी जिल्ह्यातील ९ धरणे तुडुंब
रत्नागिरी : मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्यापाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ६७ धरणांपैकी ९ धरणे आताच १०० टक्के भरली असून, १४ धरणांमध्ये ७५ टक्के तर १३ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. सध्या अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र, पाऊस थांबल्यानंतर उष्णतेत वाढ होत असल्याने पाऊस लांबला तर पुन्हा धरणांच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे.
यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मे महिन्यातील पावसाने गेल्या २० वर्षांतील पहिलाच उच्चांक केला आहे. या मे महिन्यात सर्वाधिक १३ दिवस संगमेश्वरमध्ये पाऊस पडला. त्यामुळे मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई काहीअंशी कमी होण्यास मदत झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६८ धरणे आहेत. त्यापैकी नातूवाडी (ता. खेड), गडनदी (ता. संगमेश्वर) आणि अर्जुना (ता. राजापूर) हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. तर उर्वरित ६५ लघु प्रकल्प आहेत. यापैकी २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण कोसळल्याने यात पाणीसाठा होत नाही. तसेच राजवाडी आणि काेंडवाडी या दोन नादुरुस्त धरणांमध्ये पाणीसाठा केला जात नाही. तर सात धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी साठा ठेवला जातो.
मे महिन्याच्या उत्तरार्धात सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीटंचाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे आटलेल्या धरणांमध्येही पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. मे महिन्याच्या २९ तारखेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ६८ धरणांपैकी ३६ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.
नद्यांच्या पाणी पातळीतही झाली वाढ
रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या जगबुडी, वाशिष्ठी, स्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदी अशा आठ नद्या आहेत. उन्हाळ्यात या नद्यांची पात्रे कोरडी होऊ लागली होती. मात्र, ते महिन्यात पडलेल्या पावसामुळे या नद्यांची पात्रेही भरलेली आहेत. पाऊस लांबल्यास धरणाप्रमाणे नद्यांच्या पात्रातही घट होण्याची शक्यता आहे.