Ratnagiri: विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा शिक्षक शाळेत दिसताच पालक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:31 IST2025-06-18T13:31:10+5:302025-06-18T13:31:10+5:30

सागवे शाळा प्रशासनाला विचारला जाब; शिक्षकावर पोक्सोचा गुन्हा; अटक

Parents angry after teacher seen abusing female students at school | Ratnagiri: विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा शिक्षक शाळेत दिसताच पालक संतप्त

Ratnagiri: विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा शिक्षक शाळेत दिसताच पालक संतप्त

राजापूर : गतवर्षी विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याच्या आरोपामुळे सागवे हायस्कूलबाहेर गेलेला शिक्षक शाळेच्या पहिल्याच दिवशी पुन्हा शाळेत दिसल्याने सागवेतील पालक, ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी नाटे पोलिस स्थानकात शिक्षक बलवंत आनंदा मोहिते याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्याला पोक्सोअंतर्गत अटक केली आहे. त्याला १ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने नाटे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये संबंधित शिक्षकावर विद्यार्थिनींच्या गैरवर्तनाचा आरोप झाला होता. त्यावेळी ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासनाने समजुतीने निर्णय घेऊन त्या शिक्षकाला शाळेत पुन्हा घेण्यात येणार नाही, असे ठरविण्यात आले होते. मात्र, सोमवारी १६ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी बलवंत मोहिते अचानक शाळेत हजर झाल्याचे दिसले.

ही माहिती कळताच संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेवर धडक देत या प्रकाराचा निषेध केला. ज्याच्यावर मुलीशी गैरवर्तनाचे आरोप आहेत, त्याला शाळेत पुन्हा कसा घेतला, अशी विचारणा केली. सप्टेंबर २०२४ पासून हा शिक्षक शाळेत हजर नव्हता. मात्र, तरी त्याला शाळेबाहेर मस्टर देऊन आतापर्यंत सर्व पगार काढण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी त्याने आपण शाळेत हजर होत आहे असे पत्र दिल्यावर त्याला शाळेत घेण्यात आले. याचाच अर्थ त्याला मुख्याध्यापक आणि प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत पालक व ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला. त्या शिक्षकाला शाळेबाहेर काढा, अन्यथा आम्ही मुलांना शाळेतच पाठविणार नाही, असेही पालकांनी निक्षून सांगितले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत नाटे पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर नाटे पोलिस स्थानकाचे कर्मचारी तत्काळ शाळेत दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पालकांच्या तक्रारीनंतर त्या शिक्षकावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. नाटे सागरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अश्वनाथ खेडकर अधिक तपास करत आहेत.

Web Title: Parents angry after teacher seen abusing female students at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.