रत्नागिरीत बस-कारची समोरासमोर धडक; अपघातात तरुण ठार, चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:21 IST2025-04-04T15:21:15+5:302025-04-04T15:21:29+5:30
रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बस आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चाैघे ...

रत्नागिरीत बस-कारची समोरासमोर धडक; अपघातात तरुण ठार, चौघे जखमी
रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बस आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चाैघे किरकोळ जखमी झाले आहेत. विकास कोंडिबा नवसरे (३४, रा. ठाणे, मुंबई), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, हा अपघात गुरुवारी सकाळी झाला.
या अपघात कारमधील रविकुमार नागारम (४४), नमन अगरवाल, किशोर तांदळे, सागर भादवे हे चाैघे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत बसचालक रविकांत नानासाहेब मिसाळ (३७, मूळ रा. बीड, सध्या रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ते बस (एमएच १४ बीटी २४८१) घेऊन रत्नागिरी ते जयगड असे जात होते. ते कारवांचीवाडी फाट्याच्या पुढे एका ढाब्याच्या समोर आले असता रत्नागिरीकडे येणाऱ्या कार (एमएच ०४ एलएच १६७८)ने बसला समोरून जोराची धडक दिली.
या अपघातात विकास नवसरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून अपघाताचा पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात करण्याची कार्यवाही सुरू होती.
बैठकीसाठी येताना अपघात
अपघातग्रस्त कार ही एका मायक्राे फायनान्स कंपनीची असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण मुंबईतून रत्नागिरीत एका बैठकीसाठी येत हाेते, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, रस्त्यावरील डायव्हर्जनचा अंदाज न आल्याने गाडी बसवर जाऊन आदळली आणि अपघात झाला.