दोन ट्रकच्या अपघातात एकजण ठार, पाच जखमी
By मनोज मुळ्ये | Updated: July 12, 2023 21:26 IST2023-07-12T21:26:03+5:302023-07-12T21:26:21+5:30
ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही चालक केबिनमध्ये अडकून पडले होते.

दोन ट्रकच्या अपघातात एकजण ठार, पाच जखमी
देवरुख : दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाचजण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर करंजारी येथे वळणावर घडली. या धडकेमुळे एका चालकाचा पाय केबिनमध्येच अडकला होता.
देवरुख पोलिस स्थानकामधून मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रक (एमएच १२ केपी ७९६३) कोल्हापूरहून जयगडकडे जात होता. त्यावर रामभाजू यादव (३८, रा. हवेली पुणे, मूळ रा. उत्तरप्रदेश) हे चालक होते. याचवेळी समोरुन येणाऱ्या ट्रकशी (एमएच ४२ बी ८९६१) त्याची जोरदार धडक झाली. सुनील गंगाराम फोंडे (३० रा. साखरपा, ता. संगमेश्वर) या ट्रकमधून लाकडे घेऊन साखरप्याकडे जात होते.
ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही चालक केबिनमध्ये अडकून पडले होते. ग्रामस्थ व पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढले. चालक रामभजू यादव गंभीर जखमी होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. दुसऱ्या गाडीचे चालक सुनील गंगाराम फोंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या ट्रकमधील गणेश रामचंद्र बोडेकर (३३), राजेश गंगाराम रावण (३३), योगेश कृष्णा यादव (२९), सूरज सुरेश करवजे (२९, सर्व राहणार चाफवली ता. संगमेश्वर) हेही या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या तसेच शासनाच्या रुग्णवाहिकेमधून पाली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती कळताच देवरुख पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप पोवार, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील, देवरुखचे हेडकॉन्स्टेबल सागर मुरुडकर, साखरपा दूरक्षेत्राचे नितीन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन रात्री उशिरा पंचनामा केला