Ratnagiri: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:25 IST2025-07-18T12:25:17+5:302025-07-18T12:25:52+5:30
पीडिता घरात एकटीच असताना तिच्या घरात घुसून अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली

Ratnagiri: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील झर्ये-सुतारवाडी येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वासुदेव अर्जुन गुरव ऊर्फ वासू बाबा (७७, रा. राजापूर झर्ये, सुतारवाडी) असे या आरोपीचे नाव आहे.
वासुदेव गुरवने ७ ऑक्टोबर २०२२ रोजी १२ वर्षांची पीडिता घरात एकटीच असताना तिच्या घरात घुसून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणालाही काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२२ रोजीही त्याने तिला अशीच धमकी देत अत्याचार केला. त्याच्या धमकीला घाबरून तिने याबाबत कोणालाही काही सांगितले नव्हते.
दरम्यान, डिसेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात पीडित मुलगी घराच्या बाजूच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असताना वासुदेव गुरवने तिला आपण थर्टी फर्स्ट कधी करूया, असे विचारले. त्याच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने सर्व हकिकत आपल्या नातेवाइकांना सांगितली आणि या प्रकरणी पीडितेने ३० जानेवारी २०२३ रोजी राजापूर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुरव याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३७६ (३), ५०६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत ४, ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मधुकर मौले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी १७ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार विकास खांदारे यांनी काम पाहिले.
पीडितेला मिळणार दंडाची रक्कम
या प्रकरणी न्यायालयाने आरोपी वासुदेव गुरव याला १० हजार रुपये दंडही ठाेठावला आहे. दंडाची ही रक्कम पीडितेला देण्यात येणार आहे.