Ratnagiri: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे अर्भकाचा मृत्यू, २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:40 IST2025-06-14T15:39:57+5:302025-06-14T15:40:41+5:30

मातेचे गर्भाशयही काढले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील प्रकार

Newborn dies due to medical negligence in Rajapur Case registered against 2 doctors | Ratnagiri: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे अर्भकाचा मृत्यू, २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Ratnagiri: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे अर्भकाचा मृत्यू, २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

राजापूर : येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस स्थानकात दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राम मेस्त्री आणि डॉ. डवरी अशी त्यांची नावे आहेत.

तेजेश दीपक रायबागकर (३६, रा. पाचल बाजारपेठ, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांची पत्नी तृप्ती रायबागकर यांना ३० मार्च २०२४ रोजी पहाटे ३:३० वाजता प्रसूतीसाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. डवरी यांनी तृप्ती यांची प्रकृती गंभीर असतानाही त्यांना वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात पाठवले नाही आणि सायंकाळपर्यंत रायपाटण ग्रामीण रुग्णालयातच थांबवून ठेवले, असा आरोप रायबागकर यांनी केला आहे.

याच दरम्यान, रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राम मेस्त्री हे २४ तास रुग्णालयात हजर नव्हते. त्यांनी वेळेवर उपचार न करता, आपली दिशाभूल करून शासकीय रुग्णवाहिकेचा गैरवापर करत तृप्ती यांना त्यांच्या खासगी वृंदावन रुग्णालयात दाखल केले, असे तेजेश रायबागकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. यावेळी नवजात बालकाला रत्नागिरी येथे नेत असताना त्यांनी ऑक्सिजन न लावताच नेले, असेही फिर्यादीत नमूद आहे.

रत्नागिरी येथील डॉ. संघवीकर यांनी नवजात बालकाला कोल्हापूर येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, बालकाला प्रथम साईस्पर्श हॉस्पिटल आणि त्यानंतर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे त्या नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. डॉ. मेस्त्री आणि डॉ. डवरी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे पत्नीचे गर्भाशय काढावे लागले आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला, असे तेजेश रायबागकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:२० वाजता राजापूर पोलिस स्थानकात भादंवि कलम ३०४ (अ), ३३८, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Newborn dies due to medical negligence in Rajapur Case registered against 2 doctors