चिपळूणमधील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात, शिंदेसेनेचा गळ रिकामा राहण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:21 IST2025-08-06T19:20:27+5:302025-08-06T19:21:09+5:30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात राजकीय उलथापालथ सुरू

चिपळूणमधील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात, शिंदेसेनेचा गळ रिकामा राहण्याची शक्यता
चिपळूण : विधानसभा निवडणुकीत सक्रिय राहिलेल्या येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बड्या नेत्याने मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात राजकीय उलथापालथ सुरू असताना या बड्या नेत्याने भाजपची वाट धरल्याची चर्चाही जोरदारपणे सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षप्रवेशाबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत. विशेषतः सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेतच पक्षप्रवेशाची चढाओढ सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विभागात पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. चिपळुणातही अनेकजण त्यांच्या संपर्कात असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील तसेच उद्धवसेनेतीलही काहीजण शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
आता पक्षप्रवेशाबाबतीत भाजपही सक्रिय होऊ लागला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून भाजपने पक्षांतर्गत सक्रिय सदस्यपदाचा उपक्रम हाती घेतला आहे. जे कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय आहेत, त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत. मात्र, जे सदस्य सक्रियतेचा फॉर्म भरत नाही, त्यांना काही समित्यांवरून पायउतार केल्याचे प्रकारही येथे घडले आहेत.
भाजपच्या संपर्कात चिपळूणचा बडा नेता असून, येत्या काही दिवसात या नेत्याचा पक्षप्रवेश मुंबई येथे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी या नेत्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. या नेत्याचा पक्षप्रवेश झाल्यानंतर संगमेश्वर विभागातील श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वर देवस्थान येथून नव्या दमाने कामाला सुरवात केली जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
शिंदेसेनेचा गळ रिकामा?
या नेत्यासाठी शिंदेसेनेने गळ टाकला होता. बराच काळ त्यासाठी दोस्ती वाढवली जात होती. मात्र, आयत्यावेळी हा नेता शिंदेसेनेच्या गळाला न अडकला भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.